प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
मुरबाड-कल्याण मार्गावर भीषण अपघात
मुरबाडः १३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास कल्याण-मुरबाड-माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नवीन पुलावर अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (काळी पिवळी) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. सदरची धडक इतकी भीषण होती की यात ओम्नी कारचा अक्षरशः चक्काचूर होत, त्यातील ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असून या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
१३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास कल्याण-मुरबाड-माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावरुन जात असताना सदर अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, गाडीतील सर्व ११ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहेत.
रायता पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही प्रशासनाने घाईघाईत पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली होती. प्रशासनाने योग्य ती काळजी न घेता पुल सुरु केला. त्यामुळेच एकाच मार्गिकेवर दोन्ही बाजुची वाहने आल्याने भीषण अपघात झाला, असे संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी सांगितले.
अपघातात सापडलेल्या इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते, ज्यामुळे अपघाताची तीव्रता आणि मृतांचा आकडा वाढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता ५ अधिक १ असताना त्यामध्ये ११ प्रवासी प्रवास करत होते. सदर बाब अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ पैकी ९ मृत व्यक्तींची ओळख पटली आहे. त्यांची नावेः
प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने (२१ वर्षे) - देवगाव, मुरबाड.
भूषण घोरपडे (४९) - अंधेरी, मुंबई (महसूल सहाय्यक, तहसीलदार कार्यालय मुरबाड).
जिजा गोविंदा केंबारी (५०) - टेंभरे, मुरबाड.
अनंता पवार - साखरे, मुरबाड.
दीपक गवळी - कल्याण.
गणपत जैनू मधे (३२) - देवराळवाडी, मुरबाड.
स्नेहा मोहपे (सुमारे २२) - नारायणगाव, मुरबाड.
मानसी मोहपे (सुमारे २०) - नारायणगाव, मुरबाड.
प्रथमेश मोहपे (सुमारे १७ ) - नारायणगाव, मुरबाड.
तर दोन मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, मुरबाड तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या निधनाने महसूल विभागातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदरचा अपघात नेमका कशामुळे झाला, गाडीचा ताबा सुटला की अन्य कोणत्या वाहनाने धडक दिली, याचा तपास स्थानिक पोलीस करीत आहेत. रायते पुलावरील या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.