माथाडी चळवळ थांबविणे अशक्य -मुख्यमंत्री

नवी मुंबई : घर संसार संस्थान इत्यादी गोष्टी कुर्बान करुन अण्णासाहेब पाटील या महापुरूषाने माथाडी चळवळ निःस्वार्थपणे उभारली आणि लाखो माथाडी कामगारांचे भविष्य उज्वल केले. आज त्यांचा वारसा निस्वार्थ भावनेने चळवळ कार्यरत ठेवली गेली आहे. या चळवळीची पाळेमुळे खोलवर गेली असून या चळवळीला कुणीही थांबवू किंवा अडवू शकत नाही, असे गौरवोद्दगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत काढले.

माथाडी कामगारांंचे आराध्य दैवत कै. अण्णासाहेब पाटील यांंच्या ९२ व्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी तुर्भे, एपीएमसी येथील कांदा बटाटा मार्केट मधील लिलावगृहात आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. समाजात भांडणे, दुही निर्माण न करता छत्रपती शिवरायांच्या कार्याच्या दिशेने चालणार आहोत.

मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्यायालयामार्फत तसेच शासनामार्फत योग्य तो निर्णय घेतले आहेत आणि घेत आहोत. सारथी या संस्थेमार्फत मराठा समाजाचे हजारो अधिकारी निर्माण केले. उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निवासाची सोय होण्यासाठी शासनामार्फत आर्थिक सहकार्य केले. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करुन जवळपास दीड लाख उद्योजक निर्माण केले. त्यामुळे ते आज नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील आणि कार्याध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे सिडकोच्या घरांचा प्रश्न, नाशिक, सातारा येथील माथाडी कामगारांचा तसेच पुणे येथील माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत येत्या १५ दिवसात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवचन दिले. तसेच नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या महामंडळाच्या कारकिर्दीत महामंडळाच्या माध्यमातून ५ लाख उद्योजक निर्माण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या मेळाव्यात बोलताना संघटनेचे सरचिटणीस तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न, बाजार समितीतील मार्केटमध्ये चालणारा किरकोळ व्यापार, वडाळाच्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत देवाभाऊंनी लवकरात लवकर त्यांच्या मागील मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत माथाडी कामगारांना केलेल्या सहकार्याप्रमाणे आताही सहकार्य करावे, अशी विनंती केली. तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अण्णासाहेबांनी दुरदृष्टीने मराठा समाजाच्या भव्य मोर्चामध्ये मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार आताच्या काळात जातीपातीच राजकारण कमी करायचे असेल तर आरक्षणाच्याबाबत न्याय देण्यासाठी एक महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली.

संघटनेचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या विविध समस्यांची पूर्तता होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळीच दखल घ्यावी, असे सुचित केले. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाड्यापासून अनेक विभागात शेतकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्तांना तत्परतेने मदत करावी. देशावर किंवा राज्यावर संकट आल्यानंतर ते संकट निवारण्यासाठी माथाडी कामगार अग्रभागी असतातआणि  आपले योगदान देतात. यावेळीही आम्ही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना माथाडी कामगारांचा एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला असून शासन आणि विविध संस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असेही आवाहन आ. शिंदे यांनी केले.

या मेळाव्यामध्ये १७ गुणवंत माथाडी कामगारांचा माथाडी भूषण देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्याप्रसंगी वनेमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मंदाताई म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, मनोज जामसुतकर, माजी खासदार संजीव नाईक, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख, रुनवाल ग्रुपचे सुबोध रुनवाल, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस  आनंद पाटील, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. भारती पाटील, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, माथाडी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंतराव अण्णासाहेब पाटील, प्राना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्राची नरेंद्र पाटील, नवी मुंबईतील नगरसेवक, बाजार समितीचे पदाधिकारी तसेच व्यापारी प्रतिनिधी आणि माथाडी कामगार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये उपस्थितांचे आभार आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे संयुक्त सरचिटणीस-जनसंपर्क अधिकारी पोपटराव रामचंद्र देशमुख यांनी केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सानपाडा पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन