कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील कर्मचाऱ्यांना अखेर नियुक्तीपत्र वाटप
कल्याण : नवरात्रीच्या मुहूर्तावर कल्याण ग्रामीणमधील कामगारांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील ४९९ कर्मचाऱ्यांना अखेर नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयात्नाने हा प्रश्न मार्गी लागला. या ऐतिहासिक क्षणी सर्व कामगार वर्ग आणि त्यांच्या परिवाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त हर्षल गायकवाड आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते आज कामगारांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, उपतालुका प्रमुख गजानन पाटील, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, गुलाब वझे, दत्ता वझे, जलिंदर पाटील, मोरेश्वर भोईर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. नवरात्रीच्या मंगल प्रसंगी झालेल्या या नियुक्तीपत्र वितरणामुळे कामगार व त्यांच्या परिवारात आनंदाचे, समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा दिवस आनंदाचा, विजयाचा आणि अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.