‘भिवंडी'चे महापौर पद खुला प्रवर्गासाठी राखीव

भिवंडी : महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत भिवंडी महापालिकेचे महापौर पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा नगरसेवक महापौर होईल, अशी चिन्हे स्पष्ट होत आहेत. त्यानुसार ‘समाजवादी पक्ष'चे आमदार रईस शेख यांच्या पसंतीचे निकटवर्तीय तारिक मोमीन यांचे नाव सर्वाधिक चर्चेमध्ये आले आहे.

३० सदस्य निवडून आलेला काँग्रेस पक्ष भिवंडी महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असून त्या खालोखाल भाजपा २२, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) १२, शिवसेना १२, समाजवादी पक्ष ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३ तर १ अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. मागील वेळी महापौर पद सर्वसाधारण महिलाकरिता राखीव होते. काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट'चे संख्या बळ पाहता बहुमतासाठी अवघे ४ सदस्य कमी पडत आहे. त्यामुळे सत्तेच्या बाजुने समाजवादी पार्टी, कोणार्क विकास आघाडी आणि भिवंडी विकास आघाडी जाण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची पडझड होत असताना भिवंडीत पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर आरुढ होणार अशी चिन्हे जवळपास स्पष्ट होत आहेत. ‘काँग्रेस'च्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी अनुभवी ज्येष्ठ सदस्य संख्येने कमी असून बहुसंख्य नगरसेवक नव्याने निवडून आलेले नवखे आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी आमदार रईस शेख यांचे जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे तारिक मोमीन यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून त्यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडू शकते. त्या खालोखाल ‘काँग्रेस'चे प्रशांत लाड यांचे नावही चर्चेत आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

२७ जानेवारी रोजी भाजपा गटनेत्याची नियुक्ती