आदिवासी पाड्यातील टेहळणी मनोरे बनले खेळाची साधने

भाईंदर : वन क्षेत्रात वाढणारी घुसखोरी तसेच उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात नागरी वस्तीत बिबट्यांचा वाढणारा वावर, वाढता तापमानामुळे वणवा लागण्याची वाढती शक्यता तसेच वन्य प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाकडून मिरा रोड परिसरातील माशाचा पाडा, मांडवी पाडा, दाचकुल पाडा या भागात टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. या मनोऱ्यावर स्थानिक नागरिक आणि लहान मुलांनी त्याला खेळाचे साधन बनविल्यामुळे मूळ हेतू तर दूर राहिला; पण त्यामुळे नागरिक आणि मुलांच्या बाबतीत दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईला लागूनच असलेल्या मिरा-भाईंदर शहरात आदिवासी समाजाची वस्ती असलेले माशाचा पाडा, दाचकूल पाडा, बाभळीचा भाट असे अनेक छोटे छोटे पाडे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान'च्या कुशीत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने डोंगर आणि जंगलातून पाण्याच्या शोधात येणाऱ्या बिबट्याचा वावर वाढत असतो. वाढत्या तापमानामुळे वणवा लागण्याची शक्यता सुध्दा वाढत असते. तसेच सर्प आणि सरपटणारे वन्यजीव आदिवासी वस्तीत आढळू लागतात. यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाकडून माशाचा पाडा, मांडवी पाडा, दाचकुल पाडा या भागात टेहाळणी मनोरे उभारण्यात आले आहेत.

या मनोऱ्यांवर वन विभागाने टेहळणीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे अपेक्षित होते, किंवा सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे आहे. याठिकाणी कर्मचारी नसल्याने तसेच उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाल्याने अनेक मुले आणि नागरिकांनी टेहळणी मनोरे खेळाचे साधन बनवले आहे. उंच मनोऱ्यावर लहान मुले चढून जात असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मनोरे उभारण्याचा मूळ हेतू साध्य होत नसल्याने याकडे वन विभागाने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच वन्यजीव प्रेमी सचिन जांभळे यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘केडीएमसी'कडून १४ इमारती अतिधोकादायक घोषित