दृष्टीबाधित टी-२० क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

मुंबई : भारताच्या ‘दृष्टीबाधित महिला टी-२० क्रिकेट संघ'ने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीममधील खेळाडुंचा सत्कार केला. महिला खेळाडुंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात विश्वविजेत्या संघातील खेळांडुचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा-युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उगले, संघाच्या कर्णधार दीपिका टी. सी., उपकर्णधार तथा महाराष्ट्राची खेळाडू गंगा कदम, ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडिया'चे चेअरमन के. जी. महंतेश, ‘क्रीडा विभाग'चे उपसचिव सुनील पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, आदि उपस्थित होते.

या खेळाडूंनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले असून तिरंग्याचा सन्मान वाढवला आहे. असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. अंतिम सामन्यात निर्णायक विजय मिळवत भारतीय मुलींनी दृष्टीबाधित क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिध्द करीत इतिहासामध्ये ‘दृष्टीबाधित महिला टी-२० क्रिकेट'चे पहिले चॅम्पियन म्हणून भारताचे नाव कोरले गेले आहे. या यशामागे खेळाडूंनी घेतलेले अपार कष्ट, सातत्यपूर्ण सराव आणि अनेक अडचणींवर मात करण्याची जिद्द आहे.

प्रत्येक खेळाडुची स्वतःची संघर्षकथा असून प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता त्यांनी सराव सुरु ठेवला. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, ते या संघाने प्रत्यक्षात उतरवले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघाचा गौरव केला.

यावेळी क्रीडा आयुक्त तेली-उगले यांनी प्रास्ताविकात दृष्टीबाधित खेळाडुंनी दाखविलेल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनतीचा उल्लेख करुन या खेळाडूंचा अभिमान असल्याचे सांगितले.

वडिलांचे स्वप्न पूर्ण - उपकर्णधार गंगा कदम
यावेळी संघाची उपकर्णधार गंगा कदम यांनी भावना व्यक्त केल्या. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी खेळात पुढे जावे. नियमित सराव करत असताना अचानक वडिलांचे निधन झाले. त्या दुःखातून सावरायला मला वेळ लागला. त्यावेळी आता खेळ सोड, शिक्षण करून काहीतरी वेगळे कर, असे अनेकांनी सांगितले. पण, मला वडिलांनी पाहिलेले स्वप्न माहीत होते. वडिलांच्या निधनानंतर १३ दिवसांनी मी पुन्हा सरावाला सुरुवात केली. तो निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण; पण सगळ्यात महत्त्वाचा होता, असे सांगताना कदम भावूक झाल्या.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार