नवी मुंबई विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने आता स्वतंत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे स्थापन होणार आहे. राज्य शासनाने या नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीस मंजुरी दिली असून, त्यासाठी विविध संवर्गातील एकूण १०८ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पोलीस ठाण्यासाठी ३.३८ कोटी रुपये आवर्ती आणि १.७६ कोटी रुपये अनावर्ती खर्चासही शासनाने मान्यता दिली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल शहर आणि उलवे पोलीस ठाण्यांच्या हद्दींचे विभाजन करुन सदर नवीन पोलीस ठाणे स्थापन केले जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी २०१८ रोजी कोंबडभुजे येथे पार पडला होता. विमानतळाचे बांधकाम ५ टप्प्यामध्ये पूर्ण होणार असून, येथे ४ प्रवासी टर्मिनल्स, २ रनवे, १ कार्गो ट्रक टर्मिनल आणि संरक्षण तसेच नागरी हवाई वाहतूक विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक वर्षी ९ कोटी प्रवासी आणि ३६० कोटी मेट्रिक टन माल या ठिकाणी हाताळला जाण्याची अपेक्षा आहे. इतक्या मोठया प्रमाणात होणारी वाहतूक आणि सुरक्षा लक्षात घेऊन स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.
दरम्यान, जुलै महिन्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्चना करण्यात आली आहे. या पुनर्चनेत परिमंडळ-१ (वाशी) आणि परिमंडळ-२ (पनवेल) यांच्या पुनर्रचनेतून नवे तिसरे परिमंडळ-२ (बेलापूर) स्थापन करण्यात आले आहे. याच पुनर्रचनेत विमानतळ आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसराची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार ६ ऑवटोबर रोजी राज्याच्या गृह विभागाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा जीआर देखील प्रसिध्द करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, या नवीन पोलीस ठाण्यामुळे पनवेल, उलवे आणि नव्याने स्थापन होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्द निश्चितीचा प्रस्ताव नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून लवकरच शासनास सादर करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने ८ ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यातच विमानतळ पोलीस ठाण्याची निर्मिती विमानतळ परिसराच्या सुरक्षेला आणि कायदा-सुव्यवस्थेला नवी बळकटी देणारी ठरणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांमध्ये पोलीस निरीक्षक-२, सहायक पोलीस निरीक्षक-३, पोलीस उपनिरीक्षक-६, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक-६, पोलीस हवालदार-२७, पोलीस शिपाइ४२, महिला पोलीस शिपाई-१९, चालक पोलीस शिपाई-३ अशा एकूण १०८ पदांचा समावेश आहे.