प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
१५ हजारहून अधिक थकबाकीदारांकडून ८१ कोटींचा कर जमा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘अभय योजना'ची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे ४ दिवस शिल्लक असून अद्यापही ज्या थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरला नाही त्यांनी तो ३१ मार्च २०२६ पर्यंत भरावा, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७५५ कोटी रुपये मालमत्ताकर जमा झाला असून आतापर्यंत २ लाख १४ हजार ९०० मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला आहे. यापैकी ६१.५ टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाईन तर ३८.५ टक्के मालमत्ताधारकांनी ऑफलाईन पध्दतीने कर भरला आहे.
याशिवाय मालमत्ताकर ‘अभय योजना'चा लाभ घेत १५,०९२ थकबाकीदारांनी एकूण ८१ कोटी ३४ लाख ४९ हजार ६८९ रुपये मालमत्ता कर भरला आहे. नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या ‘अभय योजना'ला नागरिकांचे चांगले सहकार्य लाभत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यासाठी अवघे ४ दिवस शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या मालमता कर विभागाने मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक गतीमान केली आहे.
नागरिकांना कर भरणे सोयीचे व्हावे यादृष्टीने पुढचे दिवस म्हणजेच रविवार (२९ मार्च) या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आणि ३० मार्च रोकौ देखील महानगरपालिकेची कर संकलन केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी ७ तसेच ३१ मार्च २०२६ या दिवशी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेमुळे सुट्टीच्या दिवशीही कर भरणे सुलभ होणार आहे.
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यावर्षी कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच कर भरण्याबाबत एसएमएस, नोटीस आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. याशिवाय मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजना अंतर्गत निवासी, अनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शास्तीवर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.
सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी निर्दिष्ट कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक असून या योजनेचा लाभ घेण्याची अखेरची ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. याशिवाय मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही, त्यांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nmmc.gov.in ) भेट देऊन किंवा WhatsApp Chatbot – 8291920504 द्वारे किंवा कर संकलन केंद्रात प्रत्यक्ष जाऊन आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
‘अभय योजना'चा लाभ घेण्यासाठी शेवटची संधी...
नवी मुंबई महापालिकामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अभय योजना'चा लाभ घेण्यासाठी शेवटचे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. या योजना अंतर्गत थकीत मालमत्ता कर एकरक्कमी भरल्यास विलंब दंडावर ५० टक्के सवलत दिली जात आहे. या योजनेला नागरिकांचा उत्साही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक थकबाकीदार मालमत्ताधारकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांनीही संधी न दवडता त्वरित कर भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.