प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची ३१ जानेवारी रोजी शपथ घेतली. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने शपथविधी सोहळा लोकभवन (राजभवन) मधील दरबार हॉलमध्ये पार पडला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यातच ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट'ने महत्त्वाचा निर्णय घेत स्वर्गीय अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
३१ जानेवारी रोजी राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर ना. छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन दिले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने ‘राष्ट्रवादी'च्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. सुनेत्रा पवार यांची ‘राष्ट्रवादी अजित पवार गट'च्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
या प्रक्रियेनंतर ‘राष्ट्रवादी'चे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे असे सारेजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन ‘राष्ट्रवादी'च्या गटनेत्या म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सदरचे पत्र राज्यपालांना पाठविले. यानंतर तातडीने कार्यवाही होऊन सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट'मधील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी केली होती. तत्पूर्वी यासंदर्भातील निर्णयास सुनेत्रा पवार यांनी सहमती दर्शवल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांना देण्यात आली. त्यानुसार सुनेत्रा पवार यांचा ३१ जानेवारी रोजी शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या १० मिनिटात अत्यंत साधेपणाने पार पडला.