धूळ , वायू प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात वाढलेल्या धूळ आणि वायू प्रदुषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. विशेषतः अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील रासायनिक कारखान्यांचे अपघात, विषारी वायू गळती तसेच रस्त्यांवरील बांधकाम आणि वाहतुकीची धूळ यामुळे सदर समस्या अधिकच बिकट झाली आहे. अंबरनाथची हवेची गुणवत्ता सध्या ‘अस्वस्थ' श्रेणीत असून, प्रदुषणाची सदर पातळी आता मुंबई आणि ठाणेसारख्या मोठ्या शहरांच्या जवळपास पोहोचली आहे.

रस्त्यांवरील खड्डे, कल्याण-कर्जत महामार्गावरील रहदारी, वाहनांचे प्रदुषण, रस्त्यांवर टाकलेली बांधकाम साहित्य आणि कचऱ्याचे ढिगारे यामुळे हवेतील धूळ आणि मातीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि डोळे चुरचुरण्याच्या समस्या वारंवार जाणवत आहेत.

गेल्या काही वर्षांत औद्योगिक वसाहतीत गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये रासायनिक कारखान्यात वायू गळती आणि स्फोटाच्या घटना घडल्या, ज्यात कामगार जखमी झाले आणि रहिवाशांना त्रास झाला. याहीपेक्षा गंभीर म्हणजे २७ मार्च २०२१ रोजी विषारी वायूमुळे गुदमरुन ३ कामगारांचा मृत्यू झाला होता. यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि वायू प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरिकांचा वाढता संताप लक्षात  घेऊन ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे अधिकारी जयंत कदम यांनी रात्रीच्या वेळी हेतूपुरस्सर रासायनिक वायू हवेत सोडणाऱ्या तसेच नियम मोडणाऱ्या मोरीवली आणि चिखलोली एमआयडीसी परिसरातील एकूण १३ कंपन्यांना तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यतज्ञ डॉ. मनोज कंदोई यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते कारखाने, वाहने आणि बांधकामांमुळे हवेतील पी.एम. २.५सारखे सूक्ष्म कण फुप्फुसात खोलवर जात आहेत. यामुळे दमा, ब्राँकायटिस आणि फुप्फुसाचा कर्करोग यांसारखे श्वसनाचे आजार वाढले आहेत. सर्वांत गंभीर म्हणजे सदर विषारी कण रक्तात मिसळून हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका २० ते ३० टक्क्यांनी वाढवत आहेत, ज्यामुळे तरुण वयातही बळी जात आहेत.या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद रस्त्यांचे डांबरीकरण आणि बांधकाम नियमांचे कठोर पालन करण्यासारखे उपाय करु शकते. मात्र, भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी ‘एमआयडीसी'मधील कारखान्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि शहराच्या पर्यावरणीय प्रदुषणावर तातडीने आणि कायमस्वरुपी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३८ बसथांब्यांसाठी १० कोटींचा खर्च