अभिजात मराठी भाषा सप्ताहात नवी मुंबई महापालिका कर्मचा-यांनी घेतले शुध्दलेखनाचे धडे

नवी मुंबई : आपण जसे बोलतो तसे लिहिता आले पाहिजे म्हणजे इतरांना आपल्याला काय म्हणायचे आहे ते नेमकेपणाने कळेल असे सांगत लेखक, गज़लकार जनार्दन म्हात्रे यांनी  विविध उदाहरणे देत उच्चारानुसार शब्दाक्षरे लिहिण्याच्या पध्दती सांगत मराठी शुद्धलेखनाचे धडे दिले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये आयोजित ‘अभिजात मराठीतील शुद्धलेखन’ या विषयावर जनार्दन म्हात्रे यांनी सादरीकरणाव्दारे उपस्थितांशी संवाद साधला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे व इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि नवी मुंबईकर रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.

प्रत्येक अक्षराला स्वत:ची देहबोली असते असे स्पष्ट करीत परंपरेने आपण करीत असलेल्या भाषा लिखाणातील चुका सुधारण्यासाठी ही एक प्रकारची कार्यशाळा असल्याचे म्हात्रे म्हणाले. प्रत्येक भाषेला एक व्याकरण असते. ते भाषा शिकता शिकता सहज आत्मसात होत जाते. त्यामुळे शुद्धलेखन ही वेगळी प्रक्रिया नसून भाषा शिक्षणात त्यासोबत ओघाने होणारी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.  

2022 मध्ये शुद्धलेखनाची नवी नियमावली लागू झाली आणि आपल्या बाराखडीमध्ये ‘ॲ’ आणि ‘ऑ’ हे दोन स्वर नव्याने समाविष्ट झाले अशी माहिती देत लेखनातील नुक्त्याचे महत्व जनार्दन म्हात्रे यांनी विविध उदाहरणे देत सांगितले. अद्ययावत वर्णमालेची सविस्तर माहिती देताना भाषेचे उच्चार व्यवस्थित लिहिले जावेत हा आपला आग्रह असला पाहिजे, असे ते म्हणाले.     आजच्या एआय प्रभावित युगात संगणकीय लिखाण शुद्ध असले पाहिजे याची गरज सांगतांना एआय प्रणालीद्वारे महाजालात उपलब्ध माहितीमधून आपल्याला हवी ती माहिती उपलब्ध करुन घेता येते, त्यामुळे एआयमार्फत उपलब्ध होणारी माहिती लेखनाच्या दृष्टीने अशुद्ध नसावी या करीता आपण संगणकावर टंकलिखीत करीत असलेले मराठी लिखाण शुद्ध असणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शुद्धलेखनाचे महत्व सांगताना जनार्दन म्हात्रे यांनी संगणकीय फॉन्ट तसेच मराठी लेखनासाठी वापरले जाणारे किबोर्ड व सॉफ्टवेअर यांचीही सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी बोलतांना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मराठी सौंदर्यवती भाषा असल्याचे सांगत दर कोसागणिक बोलीभाषा बदलते हे अनेक रंजक उदाहरणे देत दिलखुलास शैलीत सांगितले. 

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजात मराठी भाषा सप्ताहात लोकसहभागावर भर देत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अभय योजना'मध्ये १५ ऑक्टोंबर पर्यंत ७५ टक्के कर सवलत