प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
रिक्षा, दुचाकी चोरणारी दुक्कल गजाआड
नवी मुंबई : नेरुळ परिसरातून रिक्षा आणि मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. अरमान खडकसिंग रंधावा (वय-२७) आणि मो. इरफान जाकीर शेख (वय-१८) अशी या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून चोरीच्या दोन रिक्षा आणि दोन मोटारसायकल मिळून एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपींच्या अटकेमुळे वाहन चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
नेरुळ परिसरात मागील काही दिवसांपासून वाहन चोरीचे प्रकार वाढल्याने नेरुळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने या चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार ‘नेरुळ पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार बच्छाव, पोलीस हवालदार झांजे, कुंभार, केळगंदरे तसेच पोलीस शिपाई सोनवणे, आव्हाड, सोनवलकर, गीते आणि पाटील आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली.
आरोपी कळंबोली परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने ६ एप्रिल रोजी अरमान रंधावा आणि मो.इरफान शेख या दोन्ही आरोपींना कळंबोली परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची अधिक चौकशी करून, त्यांच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या दोन रिक्षा आणि दोन मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे नेरुळ पोलीस ठाणे मध्ये दाखल ४ गुन्हे उघड झाले आहेत.