ठाणे कारागृहात ‘ठाणे मुक्ती दिन' साजरा

ठाणेः पोर्तुगीजांच्या क्रूर सत्तेच्या जोखडातून मराठ्यांनी २७ मार्च १७३७ रोजी ठाणे किल्ला म्हणजे आताचे ठाणे कारागृह मुक्त केले. या घटनेस २८९ वर्षे पूर्ण झाली. ठाणेचा सदर ऐतिहासिक वारसा ठाणे शहरातील तरुणांनी जपावा यासाठी गेली १२ वर्षे ‘ठाणे मुक्ती दिन' साजरा केला जात असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

‘सह्याद्री प्रतिष्ठान'तर्फे २७ मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात ‘ठाणे मुक्ती दिन' साजरा करण्यात आला. यावेळी ‘प्रतिष्ठान'चे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, संस्थापक श्रमिक गोजमगुंडे उपस्थित होते.

ठाणेत पोर्तुगीजांनी अनन्वित अत्याचार करून सत्ता राबवली. येथील नागरिकांना ठाणे किल्ल्यात डांबले. २७ मार्च १७३७ रोजी मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून किल्ला मुक्त केला. पुढे इंग्रजांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना या किल्ल्यात डांबले. अनेकांना फाशी दिले. त्यामुळे तो केवळ किल्ला किंवा आताचे कारागृह नसून तो ठाणेच्या जाज्वल्य इतिहासाचा वारसा आहे. सदर वारसा जपण्याचे काम ठाण्यातील समस्त तरुण मंडळींनी करायला हवे, असे आ. केळकर म्हणाले.

‘सह्याद्री प्रतिष्ठान'तर्फे आम्ही गेली १२ वर्षे ठाणे मुक्ती दिन साजरा करीत आहोत. कारागृहात स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांचे स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे. म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास उलगडण्याचे काम हाती घेतले असल्याचीही माहिती केळकर यांनी दिली.

याप्रसंगी कारागृह अधीक्षक राणी भोसले, उपअधीक्षक भवर, कापडे, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका उषा वाघ, किशोर मसुरकर, राजेश गाडे, अरिफ बडगुजर, विशाल वाघ, ‘प्रतिष्ठान'च्या स्वप्नाली साळवी, मत्सगंधा पवार, गणेश मांगले, ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर उपस्थित होते.

कारागृह हलवण्यास ठाणेकरांचा विरोध
कारागृहाच्या ठराविक अंतरापर्यंत इमारती उभ्या करता येत नसल्याने कारागृहच हलवण्याचा डाव बिल्डर लॉबीने रचला आहे. ठाणे कारागृहात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाचे काम सुरु असून म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास जपण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरसाठी निधीही देण्यात आला असून टेंडरही तयार आहे. मात्र, अचानक काम थांबवण्यात आले आहे. कारागृह हलवण्याचा घाट घालण्यात आला आहे का? असा प्रश्न नुकताच अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. ठाणेकरांचा या स्थलांतराला ठाम विरोध आहे, असेही आ. संजय केळकर यांनी ठामपणे सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतून विमानसेवेचा विस्तार