प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘शिंदे सेना'चे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक-२४मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी असे एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेना'चे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उमेदवारी अर्ज भरलेल्या ‘भाजपा'च्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत ‘शिवसेना शिंदे गट'ने आपले खाते उघडले आहे. ‘केडीएमसी'मध्ये ‘महायुती'चा शतप्रतिशत महापौर बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या २ दिवसात इतर काही प्रभागात ‘शिवसेना'चे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
‘केडीएमसी'च्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालाने स्थानिक राजकारणात ‘शिवसेना'चे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात ‘शिवसेना'चे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून ‘भाजपा'चा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने ‘शिवसेना'ला मिळालेला सदर तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि ‘शिवसेना'वर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
‘शिवसेना'कडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ‘केडीएमसी'वर महायुतीचा महापौर बसणार आणि यामध्ये ‘शिवसेना'च्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक राहणार असल्याचे सदर ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे द्योतक मानले जात आहे.