‘सर्वपित्री अमावास्या'साठी लागणाऱ्या भाज्यांची शोधाशोध?
वाशी : भाद्रपद अमावास्या दिनी सर्वपित्री अमावास्या साजरी केली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने जेवण करुन ते कावळ्यांना खाण्यासाठी दिले जाते. राज्यात आपल्याला परीने पूर्वजांच्या नावाने जेवण जरी केले जात असले तरी नवी मुंबई शहरात आजही भाजी सोबत मासळीचे एकत्रित जेवण तयार करुन त्याचे नैवेद्य दाखवले जाते. मात्र, शहरी भागात या दिवशी लागणाऱ्या गावठी भाज्या सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांची शोधाशोध करताना नागरिकांची विशेषतः गृहिणींची चांगलीच दमछाक उडत आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोकण किनारपट्टी निसर्ग संपन्न असून, येथील शेतात पिकणारे पीक आणि सण यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे कोकणातील शेतात पिकणाऱ्या भाज्या, भात विविध सणातून देवाला अर्पण केले जातात. सर्वपित्री अमावस्या दिनी आपल्या पूर्वजांना या भाज्यांचे जेवण पितरांना अर्पण करुन त्यांचे स्मरण केले जाते. नवी मुंबई शहर वसण्याआधी या ठिकाणी शेती होती.त्यामुळे याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेती सोबतच पावसाळ्यात पुरतील अशा भाज्या लावल्या जात असत. यात भोपळा, भेंडी, करिंदा, चवळी, आबया, भाजा, सुरंड, घोसाळा आदी भाज्यांचा अधिक समावेश होता. मात्र, आता शेती गेल्याने नवी मुंबई मध्ये भाज्यांचे पीक होत नाही. परंतु, आजही येथील सणांची परंपरा कायम आहे. त्यामुळे नवी मुंबई मध्ये सण आपल्या संस्कृतीनुसार कायम साजरे केले जातात. नवी मुंबई शहर खाडीकिनारी असल्याने येथील भूमिपुत्रांचे प्रमुख खाद्य मासळी आहे. त्यामुळे सर्वपित्री अमावास्या दिवशी भाज्या आणि मासळी यांचे एकत्रित जेवण करुन ते भोपळ्याच्या पानांवर ठेवून त्याचे नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. मात्र, आज शेती गेल्याने भाज्या हव्या तशा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी नवी मुंबई मधील बाजारात दाणेदार चवळी, आबया, करिंदा या गावठी भाज्या सहज उपलब्ध नव्हत्या. परिणामी, सर्वपित्री अमावास्या दिवशी या भाज्या आवश्यक असल्याने त्यांची शोधाशोध सुरु होती.
सणांना आवश्यक असलेल्या गावठी भाज्या, फुले आता प्रामुख्याने उरण, पनवेल या भागातून वाशी मध्ये विक्रीसाठी येत असतात. मात्र, यंदा त्यांचे प्रमाणही अत्यल्प असल्याने या भाज्यांची इतर ठिकाणी शोधाशोध करावी लागली. - शर्मिला पाटील, गृहिणी - घणसोली.