पोलिसांनी संघभावना, पारदर्शकतेने काम करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे : पोलिसांनी संघभावना आणि पारदर्शकतेने काम करावे. तर पोलीस खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी, त्यासाठी शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिली.
ठाणे मधील साकेत मैदान येथे आयोजित ३५ व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १ मार्च रोजी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ. संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
समारोप सोहळ्याची सुरुवात विविध पोलीस खेळाडू पथकांच्या संचलनाने झाली. यावेळी महिला आणि पुरुष गटातील १०० मीटर धावण्याच्या अंतिम स्पर्धाही पार पडल्या.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खेळाडूंना प्रोत्साहन देताना सांगितले की, पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यभरातील २९२९ पोलीस खेळाडुंनी सहभाग घेतला, सदर बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा क्रीडा स्पर्धांमुळे पोलीस दलातील संघभावना अधिक बळकट होते. यापुढेही जास्तीत जास्त पोलीस खेळाडुंनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. महिला खेळाडुंची वाढती संख्या पाहून समाधान व्यक्त करतानाच कर्तव्य आणि क्रीडा या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.
महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून ओळखले जाते, त्याचा नावलौकिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महाराष्ट्राला आघाडीचे औद्योगिक केंद्र म्हणून मदत करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा करुन राज्य पोलिसांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिकता आणि कामगिरीचा मानदंड प्रस्थापित केला आहे, असे शेवटी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पंकज भोयर यांचा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळयाचे सूत्रसंचलन सचिन देवडे आणि श्वेता हुल्ले यांनी केले.
मिशन ऑलिम्पिक...
पोलीस खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी आहे. ऑलिम्पिकसह सर्वोच्च स्तरावर आपले पोलीस खेळाडू स्पर्धा करु शकतील, यासाठी शासन सर्व प्रकारचे आवश्यक ते सहकार्य नक्कीच करेल. यानुषंगाने ‘२०३६च्या ऑलिम्पिक'साठी भारताच्या तयारीमध्ये पोलीस संघांना समाविष्ट करण्यासाठी ‘मिशन ऑलिम्पिक' सुरु करण्यात आले आहे, असे ना. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.