पनवेलमध्येे ३ दिवसात १२ मालमत्तांवर कारवाई

कारवाईच्या भितीने दररोज कोटींंची कर वसुली

पनवेल : महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता अटकावणी मोहिमेला जोमाने सुरुवात केली आहे. मार्च महिना सुरु झाल्यापासून गेल्या ३ दिवसामध्ये १२ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन-कर आकारणी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या विविध जप्ती आणि अटकावणी पथकाच्या माध्यमातून वेगाने कारवाई केली जात असून, दररोज कोटीच्या घरामध्ये मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.

आयुक्त चितळे यांनी दिलेल्या आदेशनुसार ३ मार्च रोजी मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर प्रत्येक विभागातील वसुली पथकाने कारवाई केली असून यामध्ये खारघर पथकाने गुडवील इन्फीनिटी सोसायटीच्या ३ मालमत्तांवरील थकीत कराच्या कारवाई अंतर्गत सोसायटीच्या कार्यालयावर देखील अटकावणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच जोत्स्ना प्राईम फिटनेसवर देखील अटकावणी कारवाई करण्यात आली.

याशिवाय कामोठे पथकाने एस. एम. हांडे-पाटील यांच्या मालमत्तेवर अटकावणी कारवाई केली. याबरोबरच कळंबोली पथकाने मार्बल मार्केट मधील प्लॉट क्र. ३४, ३५, ३६ जे. बी. मार्बल कंपनी, प्लॉट क्र. ११८ वरील नारायण रावरिया यांच्यावर देखील अटकवणी करण्यात आली. तळोजा एमआयडीसी पथकाच्या वतीने भारत कोच बिल्डर्स प्रा. लि. या कंपनीवरही अटकावणी कारवाई केली.

कर अधीक्षक महेश गायकवाड आणि सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली जप्ती कारवाई तसेच वसुली कारवाईसाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. वसुली कारवाईला गती देण्यासाठी वसुली टिममध्ये वाढ करण्यात आली आहे. तर अटकावणी कारवाई अधिक तीव्र केल्यामुळे मालमत्ता कर भरण्याकडे थकीत मालमत्ताधारकांचा कल वाढू लागला आहे. जानेवारी महिन्यात महापालिकेने २७ मालमत्तांवर तर फेब्रुवारी महिन्यात २१ मालमत्तांवर अटकावणी कारवाई केली. परंतु,  अटकावणी केलेल्या मालमत्ताधारकांनी आपला अधिकांश मालमत्ता कर भरल्याने यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात आली आहे.

महापालिकेने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी  ‘PMC TAX APP’ असे मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही नागरिकांना आपला मालमत्ता कर भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने तसेच नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे.
-स्वरुप खारगे, उपायुक्त-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘स्त्रियांना आलेले आत्मभान हे प्रदीर्घ स्त्रीमुक्ती चळवळीचे फलित' - डॉ वृषाली मगदूम