‘नमुंमपा'चा कर थकबाकीदारांना इशारा

महापालिकेची ४५४  कर थकबाकीदारांना नोटीस

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभागाने कर थकबाकी असलेल्या जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ८ वॉर्डमधील ४५४ जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जप्तीची कारवाई प्रस्तावित असलेल्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ताकर त्वरित भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. अन्यथा जप्त मालमत्तांवर एप्रिल २०२५ पासून लिलाव कारवाई करण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले आहे.

‘नमुंमपा'च्या अखत्यारित असणाऱ्या विविध मालमत्तांवर ‘कर आकारणी-कर संकलन विभाग' यांच्यामार्फत मालमत्ता कर आकारणी आणि वसुलीची कार्यवाही करण्यात येते. मालमत्ता कर आकारणी पुस्तकात नोंद असलेल्या मालमत्तांच्या करांची देयके (बिल) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची 'ड' प्रकरण ८ नियम ३९ नुसार तयार करण्यात येतात. विहित मुदतीत मालमत्ता कर देयकांची रक्कम न भरलेल्या मालमत्तेवर कलम १२८ आणि प्रकरण ८, नियम ४२ ते ४८ मधील तरतुदीनुसार जप्ती कारवाई करण्यात येते. या जप्त मालमत्तांवर लिलावाद्वारे विक्री कार्यवाहीची तरतूद देखील नियमानुसार करण्यात आलेली आहे.

थकीत मालमत्ताकराच्या वसुलीसाठी जप्त केलेल्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करणे आणि त्यासाठी मालमत्तेचे मुल्यांकन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलाव मूल्यांकनासाठी अधिकृत शासकीय मुल्यकारांची (गर्व्हनमेंट व्हॅल्युअर्स) नियुक्ती करण्यात येत आहे.

कर थकबाकीदारांना करभरणा करताना आर्थिक दडपण न येण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने १० मार्च पासून ‘अभय योजना' सुरु केली आहे. थकीत कराच्या विलंब शुल्कावर ५० टक्के सूट देणाऱ्या ‘अभय योजना'चा ३१ मार्च २०२५ पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी (शनिवार-रविवार) नमुंमपा मुख्यालय आणि इतर विभागीय कार्यालयांमध्ये कर भरणा केंद्र (कॅश काऊंटर्स) सकाळी १० ते  सायंकाळी ५ या वेळेत सुरु राहतील, असे  महापालिकामार्फत सूचित करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्ता बाधित वृध्द महिला बेघर