प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
२४ मार्चपासून वाशीमध्ये रंगणार ‘महालक्ष्मी सरस'
नवी मुंबई : ग्रामीण भागातील महिलांच्या जिद्दीला, कौशल्याला आणि अस्सल पारंपरिक कलेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे ‘महालक्ष्मी सरस विक्री-प्रदर्शन २०२६' यंदा नवी मुंबईच्या दिमतीला सज्ज झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद' अभियानांतर्गत आयोजित सदर भव्य प्रदर्शन येत्या २४ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत वाशी येथील सिडको एविझबिशन सेंटर येथे रंगणार आहे. २४ मार्च रोजी या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
या प्रदर्शनात एकूण ४९० स्टॉल्समध्ये महाराष्ट्रातील २३४, तर इतर राज्यांतील ६६ स्टॉल्सचा समावेश असणार आहे. यात ७० स्टॉल्सचे भव्य ‘फुड कोर्ट' प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अस्सल शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची चव चाखता येणार आहे.
त्याशिवाय बंजारा आणि वारली आर्ट, वुडन क्रापट, हातमाग कापड, पारंपरिक आभूषणे आणि लाकडी खेळणी थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या प्रदर्शनात नाबार्ड, माविम, खादी ग्रामोद्योग आणि कृषी विभागासह विविध १८ शासकीय विभागांचे स्टॉल्सही ठेवण्यात आले आहेत.
यंदाच्या प्रदर्शनात केवळ खरेदीच नाही, तर अनुभवावरही भर देण्यात आला आहे. व्हिलेज एरियाच्या माध्यमातून समृध्द ‘पंचायत राज'चे दर्शन घडवण्यात येणार आहे. तसेच तंत्रज्ञानाची जोड देत अनामार्फकि वॉल, एआर फोटोग्राफी आणि इन्फोग्राफिक वॉल यासारख्या आधुनिक संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रदर्शन केंद्र वातानुकूलित असून लहान मुलांसाठी विशेष ‘प्ले एरिया' सुध्दा तयार करण्यात आला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीसाठी ‘उमेद'ची संपूर्ण टीम कार्यरत आहे. ग्रामीण भागातील संस्कृती, कला आणि चव एकाच छताखाली अनुभवण्यासाठी सदर प्रदर्शन नागरिक आणि पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
नवी मुंबईतील प्रदर्शनाचे सलग तिसरे वर्ष असून, यंदा याचे स्वरुप अधिक व्यापक करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या ‘उमेद' अभियानामुळे आज लाखो महिला कुशल उद्योजिका बनल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांना थेट शहरी बाजारपेठ मिळवून देणे, असा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण महिलांच्या कष्टाला आणि त्यांच्या उद्योगाला बळ देण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.
-निलेश सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी-उमेद अभियान.