ठाणे शहरातील नालेसफाई कामांचा महापौर, आयुक्तांकडून आढावा
१८६ किलोमीटर लांबीच्या नाल्यांच्या सफाईचे नियोजन -आयुक्त राव
ठाणे : ठाणे शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे शहरातील विविध भागात युध्दपातळीवर सुरु असून महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी जावून नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान नाल्यातील काढलेला गाळ तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य ठिकाणी त्याचे स्थलांतरण करणे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांच्या संरक्षक भिंतींची दुरुस्ती करणे तसेच रोबोटिक यंत्राचा वापर करुन शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
२१ एप्रिल रोजी घोडबंदर रोड येथील बटाटा कंपनी येथील नाला, कापूरबावडी, कॅसलमिल तसेच वर्तकनगर येथील थिराणी शाळेजवळील नाल्यांची पाहणी करण्यात आली. या नालेसफाई पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, नंदा पाटील, अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, नगर अभियंता, उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगरअभियंता (पाणीपुरवठा) विकास ढोले, उपनगरअभियंता (विद्युत) शुभांगी केसवणी, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, गणेश चौधरी यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
ठाणे शहरातील १८६ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी विविध प्रभागातील नालेसफाईसाठी सात ठेकेदारांची नियुक्ती करुन कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. नाल्यातून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पध्दतीने हाताळण्यासाठी त्याचे योग्य ठिकाणी स्थलांतरण यावर विशेष भर दिला जात असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
शहरातील विविध भागात सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामाचा दैनंदिन आढावा घेतला जात असून, ज्या कंत्राटदारांकडे मनुष्यबळ किंवा यंत्रसामग्रीची कमतरता भासेल त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान काही ठिकाणी जुने कल्व्हर्ट, तसेच कॅसल मिल येथील नाल्यावरील पूल जीर्ण झाला असल्याचे निदर्शनास आले असून या पुलाचे व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचे आयुक्त राव यांनी यावेळी सांगितले.
मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून ठाणे शहरातही नालेसफाईच्या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे यंदा मे अखेरपर्यत सर्व नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असा विश्वास आहे.
- शर्मिला पिंपळोलकर, महापौर-ठाणे.
मान्सूनपूर्व कामाचे नियोजन करत असताना महापालिका, एमएमआरडीए, मेट्रो, एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे. घोडबंदर रोड विविध प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असून या ठिकाणी असलेली कामे मान्सूनपूर्वी करण्यासंदर्भात सर्व प्राधिकरणासोबत या मार्गांची संयुक्त पाहणी महापौरांसमवेत करण्यात येणार आहे.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका.