आता ‘नमुंमपा'चा मालमत्ता कर भरणे सुलभ

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता धारकांना कर भरणे अधिक सोपे आणि सुलभ व्हावे यासाठी भारत बिल पेमेंट सिस्टीम (बीबीपीएस) लागू करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी ग्राहकांना महापालिका कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाईन कर भरता येणार आहे.  

नागरिकांना ऑनलाईन कर भरणे अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी नवी मुंबई महापालिका मालमत्ता कर विभागाने भारत बिल पेमेंट सिस्टीम अशी नवी प्रणाली सुरु केली आहे. नागरिकांना nmmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर किंवा My NMMC ॲपद्वारे ऑनलाईन कर भरता येणार आहे. या प्रणालीत ऑनलाइन बँकींग, यूपीआय (यूपीआय), क्रेडीट-डेबीट कार्ड, मोबाईल वॉलेटस्‌ अशा विविध पेमेंट पध्दती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कर भरणा झाल्यानंतर त्याची पावती लगेच उपलब्ध होणार आहे.  

भारत बिल पेमेंट सिस्टीम अत्याधुनिक आणि सुरक्षित असून, या प्रणालीमध्ये मालमत्ता धारकांची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. तसेच सदर प्रणालीमुळे कर भरण्याची प्रक्रिया वेगवान होणार असून त्यात थकबाकी, अंतिम दिनांक आणि इतर तपशील एका क्लिकवर सहज मिळू शकणार आहे. मालमत्ता धारकांसाठी कराशी संबंधित शंका आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ०२२-६२५३१७२७ असा विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. या हेल्पलाईनवर सोमवार ते रविवार सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना संपर्क साधता येणार आहे.  

नवी मुंबई महापालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ताकराचा भरणा सहजपणे करता यावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ‘भारत बिल पेमेंट सिस्टीम’ या पेमेंट प्रक्रियेचा मालमत्ताकर विभागाने अवलंब केला आहे. या नव्या प्रणालीमध्ये जुन्या प्रणालीमधील सर्व त्रुटी दूर करण्याकडे विशेष लक्ष दिल्याने ऑनलाईन कर भरणा प्रक्रिया अधिक सुलभ, जलद झालेली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्यासाठी महापालिका कार्यालयांमध्ये जाण्यासाठी वेळ घालविण्याची गरज भासणार नाही. त्यांना घरबसल्या आपल्या मालमत्ताकराचा भरणा करता येईल.  त्याची पावतीही ऑनलाईन उपलब्ध होईल. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता मालमत्ताकर विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून नागरिकांनी जागरुकपणे आपल्या कराचा वेळच्या वेळी भरणा करुन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मधील गावांना, आदिवासी वाड्यांमध्ये पाणी टंचाई