रिक्षा स्क्रॅप करणाऱ्या १० एजन्सी काळ्या यादीत

डोंबिवली : कल्याण उप-प्रदेशिक परिवहन विभागातील परिसरात रिक्षा स्क्रॅप एजन्सीकडून  रिक्षा मालकांना  ठरलेल्या दरापेक्षा कमी दर मिळत होता. या अन्यायवर ‘भाजपा'च्या ‘डोंबिवली रिक्षा चालक संघटना'कडून आवाज उठविण्यात आला होता. उपोषण आणि निवेदन देऊन ‘संघटना'ने केलेल्या पाठपुराव्याला तब्बल १४ महिन्यांनी यश आले. उप-प्रदेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षा स्क्रॅपच्या १० एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती ‘संघटना'चे कल्याण जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिली. या आदेशाबाबत ‘रिक्षा संघटना'ने अभिनंदन केले आहे.

८ ऑगस्ट २०२४ पासून ‘डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना'च्या माध्यमातून रिक्षा स्क्रॅप संदर्भात रिक्षा चालकांना रिक्षा स्क्रॅप करतेवेळी पूर्ण पैसे मिळत नव्हते. त्यासंदर्भातील पाठपुराव्याला अखेर यश आले. ‘डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना'च्या माध्यमातून उप-प्रादेशिक अधिकारी कल्याण यांच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. ‘कल्याण'चे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी यासंदर्भात तातडीने ज्या स्क्रॅप एजन्सी रिक्षा चालकाला पैसे देत नाहीत, त्या तसबीर, मिरची, तसलीम, राजेश गुप्ता, विनोद गुप्ता, जहीर खान, सोनू खान,जाकीर खान, रफिक खान आणि तसबीर खान अशा एकूण १० एजन्सी आणि त्यांच्या मालकांना कल्याण आरटीओ आवारात येण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

त्या ठिकाणी योग्य मोबदला देणाऱ्या एजन्सीसला नेमण्यात आले असून त्याची दखल प्रशासनाने घेतली. उप-प्रदेशिक परिवहन विभागाने रिक्षा स्क्रॅप करण्याच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावले असून ‘कल्याण आरटीओ'ने सर्टिफाय केलेला वजन काटा, आणि रिक्षा स्क्रॅप करतेवे रिक्षाच्या वजनाप्रमाणे जो काय बाजारभाव असेल, त्याप्रमाणे रिक्षा चालक-मालक यांना योग्य मोबदला देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती दत्ता माळेकर यांनी दिली.

याआधी रिक्षा चालकाला १५०० ते १७०० रुपये देऊन रिक्षा चालकाच्या तोंडाला पाने पुसली जात होती. आता ‘डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना'च्या माध्यमातून पाठपुरावा करुन रिक्षा चालकांना ५ते ६ हजार रुपये मिळत आहेत. त्या ठिकाणी योग्य एजन्सी प्रशासनाने नेमल्यामुळे रिक्षा चालक-मालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे सर्व श्रेय भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा ‘संघटना'चे अध्यक्ष रविंद्र चव्हाण, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना जाते. सहकार्य केल्याबद्दल कल्याण उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांचे संघटनेच्या वतीने आणि रिक्षा चालकांच्या वतीने आभार मानतो.
-दत्ता माळेकर, अध्यक्ष-रिक्षा संघटना, कल्याण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात सवलत; सोशल मिडियावर फसवणुकीचा संदेश