केमिकलयुक्त पाण्यामुळे वालधुनी नदीत प्रदुषण
कल्याण : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक-२ मधील भवानी नगर, अनुपम नगर, घोलप नगर, विधी परिसर, शिव अमृतधाम आणि योगीधाम या भागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीमध्ये काही औद्योगिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त दुषित पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः रात्री ८ ते ११ वाजण्याच्या दरम्यान सदर प्रकार घडत असून नदीचे स्वरुप नाल्यासारखे झाले आहे.
या प्रदुषणामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे, वायू प्रदूषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना श्वसनाचे त्रास, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या जाणवत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना भवानी चौक शाखा, विभागप्रमुख सतीश वायचळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले आहे. तसेच सदर निवेदन ‘केडीएमसी'च्या महापौर आणि आयुक्तांना देखील दिले आहे.
नदीत सोडले जाणारे केमिकलयुक्त पाणी त्वरित थांबविणे, संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करणे, प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करुन अहवाल सादर करणे. हवा आणि पाण्याची गुणवत्ता नियमित तपासणे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, लवकरात लवकर ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.