प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
कल्याण-डोंबिवलीवर पुन्हा ‘महायुती’चा भगवा फडकवा - उपमुख्यमंत्री शिंदे
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. मेळाव्यात झालेली शिवसैनिकांची प्रचंड गर्दी पाहून विरोधकांना धडकी भरली असेल. शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही आणि संकटात शिवसेना लोकांच्या दारात उभी राहते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे केले.
डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौक येथे २६ डिसेंबर रोजी झालेल्या ‘शिवसेना’च्या ‘निर्धार मेळावा’मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निर्धार या मेळाव्यातून ठामपणे व्यक्त करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात शिवसैनिकांची मोठी गर्दी होती. नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आभार व्यक्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेना चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचलेली आहे. मुख्यमंत्री असताना माझे काम जनतेने पाहिले आहे. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही आहे आणि उद्याही राहीन. कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम करत राहावे."
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री झाल्यावर काहीतरी आपल्या माता-भगिनींसाठी करायचे, या विचारातूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली. ही योजना बंद होणार नाही. मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे बोलत नाही तेही करून दाखवतो. कल्याण-डोंबिवली सांस्कृतिक आणि हिंदुत्वाची नगरी असल्याचे ते म्हणाले.
गरीबी पाहिलेला माणूस मुख्यमंत्री झाला आहे. मी कोट्यवधी भगिनींचा भाऊ आहे. जनताच माझी खरी कमाई असल्याचे सांगत ना. एकनाथ शिंदे यांनी मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्णय, शिक्षण, आरोग्य, उद्याने, शाळा आणि क्लस्टर पुनर्विकास योजनांवर भाष्य केले.
खरा कोण? आणि खोटा कोण? हे जनतेनेच ठरवले आहे. जो कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतो, त्यांना जनताच घरी बसवते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. डोंबिवलीकरांनी २०१४ पासून दिलेल्या प्रेमाचा उल्लेख करत त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. आत्मविश्वास, जिद्द, कष्ट आणि मेहनत या यशाच्या पायऱ्या आहेत. आता कल्याण-डोंबिवलीत पुन्हा भगवा फडकवूया, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सांगता केली.
कल्याण-डोंबिवली ‘महायुती’चा बालेकिल्ला - खा. डॉ. श्रीकांत शिंदे
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात गेल्या १० वर्षांतील विकासकामांचा आढावा घेतला. ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. उड्डाणपूल, रेल्वे स्थानकांचा विकास, रिंग रोड, मेट्रो-१२, कर्करोग रुग्णालय, क्लस्टर पुनर्विकास, तलावांचे सुशोभीकरण यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. कल्याण-डोंबिवली ‘महायुती’चा बालेकिल्ला असून आगामी निवडणुकीत ‘महायुती’चाच महापौर होईल, असा विश्वास खा. शिंदे यांनी व्यक्त केला.