म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
१०८ रुग्णवाहिकेची पुन्हा दिरंगाई
उल्हासनगर : उल्हासनगरातील १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापनाचा गलथानपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. जानेवारी महिन्यात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत न आल्याने राहुल इंदाटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांना निलंबित करण्यात आले. सदर घटना ताजी असतानाच ८ मार्च रोजी उल्हासनगर रेल्वे स्थानकावर पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला. रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या कमल साबळे यांना १०८ रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे तब्बल एक तास उल्हासनगर रेल्वे स्थानकात तडफडत रहावे लागले.
८ मार्च रोजी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे स्थानकावर अपघात झाला आणि यात त्यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ १०८ क्रमांकावर कॉल करुन रुग्णवाहिका बोलावली. मात्र, या महत्त्वाच्या क्षणी रुग्णवाहिका तब्बल एक तास उशिराने पोहोचली. एवढ्या विलंबानंतर सोबळे यांना उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. पण, गंभीर अवस्थेमुळे डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
महिलेच्या गंभीर प्रकृतीमुळे पुन्हा एकदा १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, दुसऱ्यांदा देखील सरकारी सेवा वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. अखेर महिलेच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका शोधली. परंतु, या सेवेसाठी ३,५०० रुपयांचा अव्वाच्या सव्वा खर्च मागण्यात आला. शेवटी उपस्थित पत्रकारांनी प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयाने जखमीला आपलीच रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. या सगळ्या प्रकारानंतर पुन्हा एकदा १०८ रुग्णवाहिका किती बेभरवश्याची आहे, ते समोर आले आहे. त्यामुळे आता तरी सरकारने डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी १०८ रुग्णवाहिकेच्या यंत्रणेवर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
१०८ क्रमांकाची रुग्णवाहिका का ठरत आहे अपयशी?
उल्हासनगर येथे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याच्या अनेक घटना घडत आहेत. तांत्रिक बिघाड, अकार्यक्षम प्रशासन आणि उदासीन यंत्रणेमुळे वेळेवर रुग्णांना मदत मिळत नाही. याचा त्रास थेट गंभीर जखमी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.
प्रशासनाचा गलथानपणा आणि नागरिकांचा संताप...
रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा आणखी किती निष्पाप जीव संकटात सापडतील, असा प्रश्न अनुत्तरीतच राहील.