प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
केडीएमसी निवडणुकीत कमळ फुलले; ‘भाजपा'चे २ उमेदवार बिनविरोध
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक-१८ मधील अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) या राखीव जागेकरिता ‘भाजपा'च्या अधिकृत उमेदवार रेखा राजन चौधरी आणि डोंबिवली पूर्वेतील पॅनल क्रमांक-२६ क सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेकरिता ‘भाजपा'च्याच आसावरी नवरे यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही. त्यामुळे कल्याण पूर्वेतून ‘भाजपा'च्या रेखा चौधरी आणि डोंबिवली पूर्वेतून आसावरी नवरे यांची बिनविरोध झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एकूण ३१ पॅनल मधील १२२ जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर अखेरचा दिवस होता.१२२ जागांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक-१८ मध्ये ४ जागा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राखीव असून यामध्ये १८-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, १८-ब सर्वसाधारण महिला, १८-क सर्वसाधारण आणि १८-ड सर्वसाधारण अशा आहेत. १८-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव जागेकरिता ‘भाजपा'च्या अधिकृत उमेदवार रेखा राजन चौधरी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती जे-४ प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-४ चे निवडणूक निर्णय अधिकारी वरुन कुमार सहारे यांनी दिली.
तर दुसरीकडे डोंबिवली पूर्वेतील पॅनल क्रमांक-२६ क या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ‘भाजपा'च्या आसावरी नवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच्यासमोर अन्य कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने आसावरी नवरे यांची निवड बिनविरोध झाली. त्यामुळे या निवडणुकीत मतदानापूर्वीच ‘भाजपा'चे कमळ फुलून कल्याण मधून रेखा चौधरी आणि डोंबिवली मधून आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड झाली.