कल्याणमध्ये मीटरप्रमाणे रिक्षाला हरताळ

कल्याण : प्रवाशांच्या वाढत्या मागणीवरुन कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरातून कल्याण उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ‘कल्याण रिक्षा चालक-मालक महासंघ'ने मीटरप्रमाणे रिक्षा शहराच्या विविध भागात जाण्यासाठी सुरु करावी म्हणून परिवहन विभागाकडे मागणी केली होती. प्रवाशांच्या या वाढत्या मागणीची आरटीओ अधिकारी आणि ‘रिक्षा संघटना'च्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत मीटर प्रमाणे रिक्षा सुरु केली होती. सुरुवातीचे दोन दिवस मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.

उद्‌घाटन प्रक्रियेसाठी मीटरप्रमाणे रिक्षा चालकांची एक रांग निर्माण करण्यात आली होती. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन रांगा वाढविण्याचा उप-प्रादेशिक परिवहन विभागाचा विचार होता. परंतु, मीटर असलेल्या रांगेतील रिक्षांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित रिक्षा चालकांनी नेहमीप्रमाणे शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक सुरू केली असल्याने मीटर प्रमाणे रिक्षा भाडे सेवेला हरताळ बसला असल्याचे दिसत आहे.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर शहराच्या विविध भागात जाण्यासाठी अनेक वेळा रिक्षा मिळणे अवघड होते. शेअर पध्दतीने रिक्षाने प्रवासी वाहतूक केली तर त्यासाठी रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहनतळावर ताटकळत राहावे लागते. अनेक प्रवासी मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करावी म्हणून रिक्षा चालकांना सांगतात. पण, कल्याणमध्ये सदर पध्दत नाही. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होतो. अनेक जाणकार प्रवाशांनी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाचा विचार करुन १० दिवसापूर्वी कल्याणचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांनी ‘रिक्षा संघटना'चे अध्यक्ष प्रणव पेणकर, संतोष नवले आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून किमान २ रांगा मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

सदर मागणी ‘संघटना'चे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी तात्काळ मान्य केली होती. त्याप्रमाणे ‘रिक्षा संघटना'च्या सुचनेप्रमाणे पहिल्या टप्प्यात एका स्वतंत्र रांगेतून ५० रिक्षा मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर लगेचच वाढीव रांगा तयार करायच्या, असे नियोजन करण्यात आले. मीटरप्रमाणे प्रवासी भाडे शहराच्या विविध भागात जाण्यासाठी ३० ते ५० रुपये होते. याच मार्गावरील शेअर पध्दतीचे भाडे मात्र १५ ते २५ रुपये असते. त्यामुळे मीटरप्रमाणे दररोज प्रवासी वाहतूक केली तर आपणास मोठा भुर्दंड बसेल असा विचार करुन मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांनी हळुहळू मीटरप्रमाणे रिक्षा प्रवासी वाहतुकीकडे पाठ फिरवली.

दिवसभरात १० ते १५ प्रवासीही मीटरप्रमाणे वाहतुकीसाठी तयार होत नसल्याने रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे रिक्षा चालकांनी पुन्हा नेहमीच्या रांगेतून शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक सुरु केली आहे. कल्याण-डोंबिवली मधील बहुतांशी प्रवाशांची मानसिकता शेअर पध्दतीने प्रवासी वाहतुकीला आहे, असे ‘रिक्षा संघटना'च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर १ ते २ कि.मी. अंतरासाठी मीटर प्रमाणे भाडेने रिक्षा प्रवास न करता शेअर रिक्षा प्रवासाला प्राधान्य देत असले तरी मीटर प्रमाणे रिक्षा भाडे प्रवासी सुविधाबाबत लोकांपर्यंत जनजागृतीमुळे पोहोचू शकली नाही. तर दिपक हाँटेल परिसरातून तात्काळ रिक्षा नियोजित ठिकाणी जाण्यास मिळत असल्याने आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षिततेमुळे अनधिकृत थांबा शेअर रिक्षा चालकांच्या पथ्यावर पडला असल्याची काही रिक्षा प्रवाशांची ओरड आहे. त्यामुळे मीटर प्रमाणे रिक्षा संकल्पना झारीतील शुक्राचार्यामुळे अमंलात येणार नसल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कर्करोग निदान उपक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद