पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची प्रचंड गर्दी

अंबरनाथ : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु झालेल्या युध्दामुळे भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होईल, या भितीने अंबरनाथ शहरात २५ मार्च रोजी सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी प्रचंड गर्दी केली होती. विशेषतः अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर असलेल्या जिओ पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. इंधन पुरवठा बंद होणार असल्याची अफवा पसरल्याने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले असून, यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर वाहनांचे प्रमाण अचानक वाढल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. सदर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पेट्रोलपंप आणि मुख्य रस्ता यांच्या दरम्यान बॅरिकेटस्‌ लावून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. केवळ जिओ पेट्रोल पंपच नव्हे, तर शहरातील विमको नाका येथील पाटील पेट्रोलपंप आणि अन्य इंधन केंद्रांवरही सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. इंधनाचा साठा संपण्यापूर्वी आपली टाकी पूर्ण भरून घेण्याच्या घाईमुळे अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या परिस्थितीवर स्पष्टीकरण देताना जिओ पेट्रोल पंप व्यवस्थापनाने सांगितले की, सध्या आमच्याकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, भविष्यातील जागतिक परिस्थितीचा अंदाज वर्तवणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यासंदर्भात योग्य त्या सूचना देत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इंधन तुटवड्याबाबतची भिती अनाठायी असून जनतेने संयम राखावा आणि शांतता पाळावी, असेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत होर्डिंग प्रकरण हायकोर्टात