‘नमुंमपा'तर्फे उपमुख्यमंत्री अजित् पवार यांना श्रध्दांजली अर्पण

नवी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात आकस्मिक झालेल्या दुःखद निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही अशी सर्वांना निःशब्द करुन टाकणारी सदरची दुर्दैवी घटना प्रत्येकाला सून्न करुन टाकणारी होती.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालया येथे अजित पवार यांच्या प्रतिमेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करुन, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, सर्व विभागप्रमुख तसेच अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत नागरिक यांच्या उपस्थितीत स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान असणाऱ्या अजित पवार यांच्यासारख्या महनीय नेतृत्वाच्या अचानक निधनामुळे महाराष्ट्राची आणि प्रशासनाची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशा शब्दात आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या पायाभरणीपासून उभारणीपर्यंत तसेच महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांना गती देण्यात आणि अनेक प्रसंगात त्यांचे योगदान लाभले जे कधीही विसरता येणार नाही, असे आयुक्त म्हणाले. मंत्रालय सेवेत असतांना त्यांच्या कामाची पध्दत जवळून पाहता आली. सातारामध्ये काम करताना त्यांचे मार्गदर्शन लाभले. कोव्हीड काळात पालघरचा जिल्हाधिकारी असताना मोठ्या प्रमाणावर कामगार आपल्या गावी स्थलांतर करीत होते, अशा वेळी आवश्यक प्रसंगी रात्री २ वाजताही त्यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांनी लगेच मदतही केली. ‘सिडको'मध्ये असतानाही त्यांचे विविध गोष्टींमध्ये मार्गदर्शन मिळाले, अशा विविध ठिकाणच्या आठवणी आयुक्त शिंदे यांनी कथन केल्या.    

दरम्यान, सदर दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्यासह निधन झालेले त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पलाईट अटेंडन्ट पिंकी माळी यांच्याही आत्म्यास चिरशांती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करीत सर्वांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिका कलावंत जपणारी - अतिरिक्त आयुक्त माळवी