प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
सिडको ओपन २०२५ गोल्फ स्पर्धेचे विजेते वीर अहलावत
नवी मुंबई : गुरुग्राम येथील गोल्फपटू वीर अहलावत यांनी खारघर व्हॅली गोल्फ कोर्स (KVGC) येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रो प्रस्तुत सिडको ओपन २०२५ गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बक्षीस वितरण समारंभात सिडकोचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) चे अध्यक्ष कपिल देव यांच्या हस्ते विजेते वीर अहलावत यांना चषक प्रदान करण्यात आला. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, लार्सन अॅण्ड टुब्रोचे वरिष्ठ उपाध्यक्ष-विशेष कार्यप्रमुख श्रीनाथ राव तसेच PGTI चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमनदीप जोहल उपस्थित होते.
वीर अहलावत यांनी अंतिम फेरीत चार-अंडर ६७ अशी कामगिरी करत एकूण १४-अंडर २७० गुणांसह तीन स्ट्रोक्सच्या फरकाने स्पर्धेत विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये ते लीडरबोर्डवर आघाडीवर होते. हा त्यांचा २०२५ मधील दुसरा तसेच एकूण सहावा व्यावसायिक विजेतेपदाचा मान पटकावला. तसेच २०२५ PGTI क्रमवारीत त्यांनी १८व्या स्थानावरून ११व्या स्थानावर झेप घेतली.
पुण्याचे गोल्फपटू रोहन ढोले पाटील यांनी एकूण ११-अंडर २७३ गुणांसह उपविजेतेपद मिळवले. PGTI वरील ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या निकालामुळे त्यांच्या क्रमवारीत ४२व्या स्थानावरून ३२व्या स्थानावर सुधारणा झाली.
गुरुग्रामचे मनु गंडास आणि इटलीचे मिशेल ऑर्टोलानी यांनी प्रत्येकी १०-अंडर २७४ गुणांसह संयुक्त तिसरे स्थान पटकावले.
चंदीगडचे गोल्फपटू रवी कुमार यांनी अंतिम फेरीत १३व्या होलवर होल-इन-वन साधत स्पर्धेतील तिसरा होल-इन-वन नोंदवला. त्यांनी एकूण चार-अंडर २८० गुणांसह संयुक्त नववे स्थान मिळवले.
नवी मुंबईतील खारघर व्हॅली गोल्फ कोर्सवर गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन होणे ही सिडकोसाठी एक महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. सिडको ओपन २०२५ स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे व सहभागी खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. १८ होल्सच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्सवर प्रथमच आयोजित करण्यात आलेली ही गोल्फ स्पर्धा यशस्वीपणे पार पडली, याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे अशा आणखी अनेक दर्जेदार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा सिडकोचा मानस आहे. - विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.