प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
केडीएमसी मालमत्ता कर वसुली उद्दिष्टांक घसरला
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी झाली असल्याने, मालमत्ता कर वसुली उद्दीष्टांक गाठू न शकल्याने यामुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे दिसत आहे. प्रशासनाने निश्चित केलेल्या ६०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ४०७ कोटी रुपयांची वसुली होऊ शकली आहे. परिणामी, एकूण वसुलीत १९२ कोटी रुपयांहून अधिक तुटवडा निर्माण झाला आहे.
१ एप्रिल २०२५ ते ३० मार्च २०२६ या आर्थिक वर्षात केडीएमसीच्या वित्त विभागाने थकीत आणि चालू अशा दोन्ही श्रेणींमध्ये कर वसुलीची मोहीम राबवली. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३० मार्च रोजीी, महानगरपालिकेच्या विविध प्रभागांमधील कर्मचाऱ्यांनी सुमारे ११ कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली केली. महानगरपालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात थकीत करापोटी २३६ कोटी रुपये आणि चालू करापोटी ३६४ कोटी रुपये, असे एकूण ६०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थकीत रकमेपैकी सुमारे १२६ कोटी ४४ लाख रुपये, तर चालू वर्षाच्या करातून २९० कोटी ५१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दोन महिन्यांपूर्वीच मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या होत्या की, निर्धारित उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाऊ शकते. याच संदर्भात १५ दिवसांपूर्वी मालमत्ता कर विभागाच्या ११२ कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वसुलीची उद्दिष्टेही देण्यात आली होती.
‘फ' (इ) प्रभाग क्षेत्राचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि त्यांच्या पथकाने निध्राारित उद्दिष्टापेक्षा सुमारे तीन कोटी रुपये अधिक वसुली केली, तर ‘ई' प्रभागात सर्वात कमी कर वसुली झाली आहे. एकूणच, महानगरपालिका केवळ ६४ टक्के उद्दिष्ट साध्य करू शकली आहे. उल्लेखनीय आहे की, मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मानला जातो. हे पाहता जाणकाराच्या मते प्रशासकीय राजवटी नंतर येत्या आर्थिक वर्षात मनपाला आर्थिक ताळेबंदाला सामारे जाता पाहता तारेवरची कसरत करावी लागणार असे यानिमित्ताने दिसत आहे. करनिर्धारक संचालक बाळासाहेब चव्हाण यांच्याशी मालमत्ता कर वसुली उद्दिष्टांक संदर्भात संपर्क साधला असता, आजची मालमत्ता कराची वसूली आकडे येणे बाकी असून यापुढेही मालमत्ता करवसूली मोहीम व्यापक सुरू राहणार असे सांगितले.