होळी नंतर हापूस आंबा दर आवाक्यात?
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात सध्या हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, ३ मार्च रोजी एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याच्या साडेतीन हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. आवक वाढत असल्याने हापूस आंबा दर देखील घसरले असून, दर्जानुसार हापूस आंबा दरात पेटीमागे ३०० ते १००० रुपयांची घसरण झाली आहे. एपीएमसी फळ बाजारात सध्या ३००० ते ६००० रुपये दर हापूस आंबा पेटीला मिळत आहे. मात्र, होळी सण सरताच एपीएमसी फळ बाजारात हापूस आंबा आवक वाढणार असून, दर देखील सर्व सामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
यंदा बाजारात देवगड हापूस आंब्याच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली. यंदा हापूस आंबा उत्पादन चांगले असेल, असा हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा अंदाज आहे. परंतु, मध्यंतरी पडलेला पाऊस आणि हवामान बदल यामुळे हापूस आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात एक महिना उशीराने हापूस आंबा हंगामाला सुरुवात होत आहे.
एपीएमसी फळ बाजारात डिसेंबरपासून तुरळक प्रमाणात हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते. यंदा हापूस आंब्याचे उत्पादन जास्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, यंदा हापूस आंब्याला मोहोर फुटण्याची वेळ असतानाच कडाक्याची थंडी आणि पाऊस पडल्याने हापूस आंबा मोहोर गळून पडला होता. परिणामी शेतकऱ्यांचा औषध फवारणी खर्च दुप्पटीने वाढला होता. याशिवाय सुरुवातीच्या हापूस आंबा उत्पादनाला फटका बसल्यामुळे उत्पादनात घट होईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. साधारणतः मार्च महिन्यात हापूस आंब्याचा खरा हंगाम सुरु होतो.मात्र, सुरुवातीच्या पावसामुळे यावेळी हापूस आंबा हंगामाला उशीरा सुरुवात होणार आहे. १५ पंधरा दिवसांपूर्वी बाजारात एक दिवस आड हापूस आंबा पेट्यांची आवक होत होती. मात्र, आता हापूस आंबा आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या एपीएमसी फळ बाजारात देवगड, रायगड आणि कर्नाटक येथून अडीच हजार हापूस आंबा पेट्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक हापूस आंबा पेट्या कोकणातील होपूस आंब्याच्या आहेत. ३ मार्च रोजी एपीएमसी फळ बाजारात ४-६ डझन असलेल्या हापूस आंब्याच्या ३५००पेट्या दाखल झाल्या असून, पेटीला ३ ते ६ हजार रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे हापूस आंबा दरात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात ४-६ डझन हापूस आंबा पेटीला ४ ते ९ हजार रुपये दर होता. तर आता होळी सण सरताच हापूस आंबा आवक आणखी वाढणार असून, दर देखील आवाक्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना देखील हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे.