प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
कचऱ्यातून उजळले नशिबाचे अक्षर
नवी मुंबई : पहाटेच्या धुक्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून उपजीविका शोधणाऱ्या महिला आणि दुपारी वही-पुस्तव्ोÀ घ्ोऊन वर्गात बसलेल्या विद्यार्थिनी असे चित्र आज नवी मुंबईत वास्तव बनले आहे. ‘स्त्री मुवती संघटना'ने नवी मुंबई महापालिकेच्या सहाय्याने सुरू केलेल्या ‘स्लम मॉडेल'मधून उभ्या राहिलेल्या कचरा वेचक महिलांचा प्रवास आता दहावीच्या बोर्ड परीक्षेपर्यंत पोहोचला आहे. वर्षानुवर्षे शिक्षणापासून दूर राहिलेल्या या महिलांपैकी १३ जणी यंदा दहावीच्या (एसएससी) परीक्षेला बसणार आहेत. ती केवळ परीक्षा नाही, तर आयुष्याला दिलेले ठाम उत्तर आहे.
‘स्त्री मुवती संघटना'ने नवी मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांतील महिलांचे संघटन उभारुन ‘स्लम मॉडेल' सुरू केले आहे. या मॉडेलमधील शेकडो महिला घरोघरी जाऊन ओला-सुका कचरा संकलन करतात. या कचऱ्याचे वर्गीकरण करुन खतनिर्मिती केली जाते. या उपक्रमामुळे महिलांना नियमित उत्पन्नाचा आधार मिळाला. मात्र, प्रकल्प फक्त स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या विकासाकडे वळला आणि त्यातूनच शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला.
या महिलांपैकी बहुतेकांच्या मनात लहानपणी शिकण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, दारिर्द्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लहान वयातच कामावर जावे लागल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट सुटले. कुणी सातवीत, कुणी आठवीत, तर कुणी नववीत शाळा सोडली. त्यानंतर लग्न, संसार आणि जगण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाही' या महिलांना दाखवण्यात आला. त्या चित्रपटातील संघर्षात त्यांना स्वतःचे प्रतिबिंब दिसले आणि आपणही शिकू शकतो, आपणही दहावी देऊ शकतो, असा विचार प्रथमच त्यांच्या मनात ठामपणे रुजला.
यानंतर प्रा. वृषाली मगदूम यांच्या पुढाकाराने दहावीच्या परीक्षेची तयारी सुरु झाली. सुरुवातीला २५ महिला पुढे आल्या; मात्र अखेर १३ जणींनी सर्व अडचणींवर मात करत परीक्षा देण्याचा निर्धार केला. बहुतेकांचे शिक्षण १५ ते २० वर्षांपूर्वी सुटले होते. लग्नानंतर नाव बदलणे, काहींचे सिंगल पॅरेंट असणे, कागदपत्रांची कमतरता यामुळे फॉर्म भरण्यापासून नोंदी जुळवण्यापर्यंत अनेक अडथळे आले. पण, सर्वांवर मात करत अखेर त्यांच्या नावांची बोर्डात नोंद झाली.
इतकी वर्षे शाळेपासून दूर असलेल्या महिलांना शिकवायचे कस। साहित्य कुठून आणायचे, अभ्यास कोण घ्ोणार, असे प्रश्नही उभे राहिले. ‘प्रभात ट्रस्ट'चे डॉ. प्रशांत थोरात यांनी शैक्षणिक साहित्य दिले. समन्वयक आशा गायकवाड यांच्या पुढाकारातून प्रशांत गाडेकर, अजित खताळ, अशोक गालवे, आशा पाटील, निशा राठोड, सचिन आमडोस्कर, पल्लवी घारगे, मधुकर वारभुवन या शिक्षकांनी मार्गदर्शन स्वीकारले. आज कोपरखैरणे येथील ‘स्त्री मुवती संघटना'च्या इमारतीत त्यांचे नियमित वर्ग भरतात.
सकाळी घरकाम, त्यानंतर कचरा संकलन आणि दुपारी थेट वर्ग, असा त्यांचा दिनक्रम आहे. सुरुवातीला काहींना कुटुंबाचा विरोध झाला. पण, त्यांची जिद्द पाहून कुटुंबीयही पाठीशी उभे राहिले. एका महिलेची मुलगी स्वतः दहावीत असून ती रोज आईचा अभ्यास घेते.
सुरुवातीची भिती आणि संकोच आता आत्मविश्वासात बदलला आहे. ‘स्त्री मुवती संघटना'मुळे आम्हाला संधी मिळाली, तिचे सोने करु, असे त्या ठामपणे सांगतात. दहावीनंतर काहीजणी पुढील शिक्षण, काही समाजकार्य, तर काही मुलांसाठी मार्गदर्शक होण्याचे स्वप्न पाहत आहेत. फक्त कचरा वेचक म्हणून नाही, तर शिकलेली, आत्मनिर्भर महिला म्हणून जगायचे आहे, असा त्यांचा समान सूर आहे.
या महिला फक्त परीक्षा देत नाहीत, त्या समाजाला धडा देत आहेत. शिक्षणासाठी ना वय अडथळा असते, ना परिस्थिती. कचऱ्यातून कागद वेचणाऱ्या हातांनी आज वही उचलली आहे, हीच खरी क्रांती आहे.
प्रा. वृषाली मगदूम, विश्वस्त-स्त्री मुवती संघटना.