म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय नागरिकत्वाचे पुरावे सादर
नवी मुंबई : वाशीतील जुहूगावात राहणाऱ्या बांग्लादेशी जोडप्याने आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवाशी दाखला, जन्म दाखला बनवून घेतल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या जोडप्याने जुहूगाव येथील घर देखील विकत घेतल्याचे तपासात आढळून आले आहे. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणीत या जोडप्याची बनावटगिरी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या जोडप्यातील पतीला अटक केली आहे. पोलिसांनी आता ३ वर्षाच्या मुलीसह पळून गेलेल्या त्याच्या पत्नीचा शोध सुरु केला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंक कक्षाने १५फेब्रुवारी रोजी वाशी जुहूगावातील वात्सल्य हरी निवास बिल्डींगवर छापा मारुन सुजत मोफिश शेख (३२), त्याची पत्नी शर्मिन सुजत शेख (२४) या बांग्लादेशी दाम्पत्याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड तसेच पश्चिम बंगाल मधील भारतगौड ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला, चांदीपुर ग्रामपंचायतीचे जन्म प्रमाणपत्र, आदि कागदपत्रे सादर केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले होते.
मात्र, पोलिसांनी या बांग्लादेशी दाम्पत्याने सादर केलेला रहिवाशी दाखला आणि जन्म प्रमाणपत्राची पश्चिम बंगाल येथील ग्रामपंचायतीकडून पडताळणी केली असता, शेख दाम्पत्याचे सादर केलेला रहिवासी दाखला आणि जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांनी या दाम्पत्यापैकी सुजत शेख याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याच्या मोबाईलमध्ये बांग्लादेशी कॉलींग कंट्री कोडने सुरु हौणारे अनेक संपर्क नंबर आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी सुजत मोफिश शेख याची चौकशी केली असता, तो आणि त्याची पत्नी १५ वर्षापूर्वी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे आणि त्यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रे बनवून भारतीय नागरिक म्हणून ओळख निर्माण केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार सुजत शेख याला अटक करण्यात आली असून फरार झालेल्या त्याच्या पत्नीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन...
नागरीकांनी बांग्लादेशी नागरिकांना घर भाड्याने देऊ नये किंवा त्यांना कामावर ठेवू नये. असे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. परदेशी नागरिकांना मदत करणाऱयांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.