पनवेल एसटी आगार समस्यांच्या विळख्यात

उरण ः पनवेल एसटी आगारातून राज्यातील कानाकोपऱ्यात एसटीची बस जाते. त्यामुळे पनवेल एसटी आगार राज्याचे महत्त्वाचे एसटी बस आगार म्हणून ओळखले जात आहे. मात्र, राज्य शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या आगाराला अनेक समस्यांनी वेढले आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पनवेल बस आगाराच्या कामासंदर्भात पाठपुरावा केला आहे. परंतु, आजतागायत पनवेल बस आगाराच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे ‘सुरत'च्या धर्तीवर केव्हा उभारले जाणार पनवेलचे बस आगार? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून विचारला जात आहे.

पनवेल सिडको कार्यक्षेत्रामधील एकमेव राज्यातील बस आगार आहे. या बस आगारातून राज्यातील कानाकोपऱ्यात एसटीची बस जाते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशी नागरिकांची रेलचेल सुरू असते. मात्र, पनवेल एसटी आगार तुंबलेली गटारे, स्वच्छतेचा अभाव, अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेले बस आगार म्हणून ओळखले जात आहे. अशा महत्त्वाच्या बस आगाराचे काम राज्य सरकारने हाती घ्यावे म्हणून अनेक संघटनांनी, आ. प्रशांत ठाकूर आणि आ. विक्रांत पाटील यांनी आवाज उठवत पाठपुरावा केला आहे.

त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल डेपोमधील समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आणि ‘सुरत'च्या धर्तीवर नवीन डेपो उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने हाती घ्ोतला आहे. त्यासाठी २३० कोटी रुपये खर्च करुन १७,५०० चौरस मीटर भूखंडावर अद्ययावत बस स्थानक उभारणार, असे अभिवचन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

आज पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात डेपो खड्डेमय होत असतो. अशातच आगारातून वेळेवर बस सोडल्या जात नाहीत. यावेळी प्रवाशी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमधील सुरत बस डेपोच्या धर्तीवर अद्ययावत पनवेल एसटी आगार बनविण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील नालेसफाई कामांना डेडलाईन १५ मे