मराठी शाळा विरुध्द सत्ताधारी संघर्ष पेटणार  

मराठी शाळांच्या खाजगीकरणाचा डाव उधळून लावणार -गजानन काळे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सर्व मराठी शाळा बंद करुन त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावरुन शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठी शाळा बंद होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'ने सत्ताधारी ‘भाजपा'विरुध्द शड्डू ठोकला आहे. या धोरणाविरोधात महापालिका मुख्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा ‘मनसे'चेे प्रववते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ‘पत्रकार परिषद'मध्ये दिला.  

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते सागर नाईक यांनी ‘नमुंमपा'च्या सर्व मराठी शाळांचे रुपांतर इंग्रजी माध्यमात करण्याचा अशासकीय ठराव मांडला होता. या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मात्र, ‘मनसे'चे एकमेव नगरसेवक अभिजीत देसाई यांनी सभागृहात याला कडाडून विरोध दर्शविला. याच पार्श्वभूमीवर ‘मनसे'ने २७ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांच्या सदर निर्णयामागे मोठे अर्थकारण आणि भ्रष्टाचार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.  

पत्रकार परिषदेत बोलताना गजानन काळे म्हणाले की, आमचा इंग्रजी माध्यमाला विरोध नाही. ज्या शाळांची पटसंख्या २०-२५ टक्क्यांच्या खाली आहे, तिथे प्रयोग म्हणून इंग्रजी शाळा सुरु करण्यास हरकत नाही. मात्र, ज्या मराठी शाळांमध्ये २०० ते ३५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्या शाळा बंद करण्याचा घाट कशासाठी? सदरचा सरळ-सरळ शाळांचे खाजगीकरण करुन त्या खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काळे यांनी केला. कोणताही अधिकृत सर्व्हे किंवा पालकांची मागणी नसताना सदर ठराव घाईघाईने का आणला गेला? असा सवालही काळे यांनी विचारला.  

धरणे आंदोलनाचा इशारा...  
मराठी शाळा वाचवण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शिक्षण तज्ञ, मुख्याध्यापक आणि सामाजिक संस्थांशी चर्चा व्हायला हवी, अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे. महापालिकेने सदर प्रस्ताव मागे न घेतल्यास महापालिका मुख्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

दरम्यान, आता नवी मुंबईतील मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आगामी काळात मनसे विरुध्द सत्ताधारी असा मोठा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.  

सदर पत्रकार परिषद प्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह मनसे नगरसेवक अभिजीत देसाई, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कौठुळे, आदि उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव