कल्याण पूर्वेतील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान नागरिकांसाठी खुले

कल्याण : मागील अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामामुळे बंद असलेले महाराष्ट्र भूषण तीर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आता नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना सकाळ-सायंकाळ फिरणे, व्यायाम आणि मुलांच्या खेळासाठी या उद्यानाचा नियमित उपयोग होता. मात्र, उद्यान दीर्घकाळ बंद ठेवल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती. दुरुस्तीची कामे पूर्ण होऊनही उद्यान नागरिकांसाठी न उघडल्याने उद्‌भवलेल्या परिस्थितीबाबत ‘राष्ट्र कल्याण पार्टी'चे महासचिव राहुल काटकर यांनी महापालिकाकडे वारंवार विनंती करुन ८ डिसेंबरपर्यंत उद्यान खुले करण्याची मागणी केली होती. मात्र, या विषयावर महापालिकाकडून वेळकाढूपणा होत असल्याचे दिसत होते.

नागरिकांचा सतत वाढणारा त्रास लक्षात घेऊन ९ डिसेंबर रोजी राहुल काटकर यांनी प्रत्यक्ष आंदोलन करत उद्यान नागरिकांसाठी खुले केले. महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून उद्यान खुले करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी राहुल काटकर यांनी उद्यानामध्ये २४ तास सुरक्षा रक्षक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे या महत्त्वाच्या मागण्या महापालिका अधिकाऱ्यांकडे मांडल्या.

सदर आंदोलनाला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), प्रहार जनशक्ती पक्ष तसेच इतर सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतला. यावेळी राष्ट्र कल्याण पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारी, प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे शरद पाटील, ॲड. नीरज कुमार तसेच इतर पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मिरा-भाईंदर फ्री वाय फाय शहर होण्याची प्रक्रिया सुरु