सानपाडा पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक अशा सानपाडा पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यावेळी ई-संवाद ऑनलाईन सेवा, सायबर / आर्थिक गुन्हे (ण्ब्-इग्) तपास कक्षाचे देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याची पाहणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी वन मंत्री गणेश नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, सह अनेक राजकीय नेते तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईत वेगवेगळे नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी गुन्हेगारीवर वचक ठेवण्याबरोबरच पोलीस दल लोकाभिमुक व्हावे, नागरीकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मागील दोन वर्षांत भारंबे यांनी नवी मुंबई शहरासाठी अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे सानपाडा पोलीस स्टेशनची नवीन इमारत. सानपाडा पामबीच येथील मोराज सर्कल समोर सानपाडा पोलीस स्टेशनची अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक असे हे पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातुन तब्बल 18 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळात या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.
सुमारे 10 कोटी रुपये खर्च करुन सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. चार मजली या इमारतीत 40 हून अधिक खोल्या असून यात स्वागत कक्ष, कर्मचारी विश्रांती गृह, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष, लॉकअप रूम, सुसज्ज पार्किंग, कोठडी, शिवाय सायबर-आर्थिक गुन्हे विभाग (सीफाय कक्ष) तसेच सर्व अधिकाऱयांसाठी स्वतंत्र दालने असून तक्रारदार आणि भेट घेणाऱयांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या पोलीस ठाण्याचे वैशिष्टÎ म्हणजे हे नवी मुंबईतील पहिले सौरऊर्जेवर चालणारे पोलीस ठाणे ठरणार आहे.सानपाडा पोलीस ठाण्यातील इमारत हि केवळ नवी मुंबईतील नव्हे तर राज्यातील सर्वात सुसज्ज पोलीस ठाणे असल्याचा दावा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे.
3 पोलीस ठाण्यांचा आयएसओ नामांकनाने सन्मान...
मुख्यमंत्र्यांनी आखलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमात वाशी, सीबीडी आणि पनवेल तालुका या तीन पोलीस ठाणे यांनी बाजी मारली आहे. यात स्वच्छता तक्रारदारांना सेवा असे अनेक मुद्दयांचा समावेश आहे. त्यासाठी या तीन्ही पोलीस स्टेशनना आयएसओ मानांकन देण्यात आले आहे. त्यामुळे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर, सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण पवार, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे या तीन पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.