वह्या बनविणाऱ्या गोदामात भीषण आग, लाखोंचे नुकसान
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मानकोली गावच्या हद्दीतील हरिहर कंपाऊंड मधील ई-१५ ए या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १ ऑवटोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
गोदाम इमारतीच्या पहिल्या मजल्यावर चित्रकला नावाची वह्या बनविणारी कंपनी असून तेथे वह्या बनविण्यात येतात. गोदामात वह्या आणि कच्चा माल म्हणून वापरला जाणारा कागद पुठ्ठा मोठ्या प्रमाणावर साठवलेला असल्याने पाहता पाहता आग संपूर्ण गोदामात पसरली. सदर घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाची गाडी वाहतूक कोंडीत अडकल्याने दीड तास उशिराने घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत या आगीत गोदामातील लाखो रुपये किंमतीच्या वह्यांसह कागद पुठ्ठा असा कच्चा माल जळून खाक झाला आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु, अग्निशामक दलाच्या जवानांना २ तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तर सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी टळली आहे.