प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा सन्मान
नवी मुंबई : फेब्रुवारी २०२६ मध्ये झिम्बावे आणि नामिबिया येथे झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारती संघाचे उपकर्णधारपद भूषविणारा यष्टीरक्षक-फलंदाज अभिज्ञान अभिषेक कुंडू याचा नवी मुंबई महापालिका सर्वसाधारण सभेत महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते सभागृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे,उपसभापती राजू मढवी, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या अभिनंदनपर प्रस्तावास विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अनुमोदन दिले. महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनीही यावेळी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली.
कोपरखैरणे येथे वास्तव्यास असलेला अभिज्ञान अभिषेक कुंडू याने १९ वर्षाखालील भारतीय संघाचा उपकर्णधार तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक, फलंदाज म्हणून भारतीय संघासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळताना एकूण 4 अर्धशतके करुन मोलाचे योगदान दिले. अंतिम सामन्यात इंग्लड विरुध्द विजयश्री मिळवून अंडर १९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत अभिज्ञान याने संपूर्ण विश्वचषक मालिकेत २३९ धावा केल्या असून संघातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली आहे.
यापूर्वी सन २०२५ मध्ये पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेतही अभिज्ञान कुंडू याने जलद द्विशतकाचा विश्वविक्रम प्रस्थापित करीत नाबाद २०९ धावा आपल्या नावावर नोंदवल्या असून भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात त्याचे मोठे योगदान राहिले आहे.
भारतीय संघामध्ये उपकर्णधार म्हणून आपले स्थान भक्कम करणारा आणि नवी मुंबई शहराचे नाव देशात आणि जगात उज्वल करणाऱ्या या उदयोन्मुख खेळाडुस नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महासभेत सन्मानित करुन त्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.