प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
कल्याणच्या राजकारणात भावनिक क्षण
कल्याण : कल्याणच्या राजकारणात दुर्मिळ आणि भावनिक क्षण पहायला मिळाला. ‘शिवसेना'च्या तिकिटावर निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका वनिता दुर्योधन पाटील यांनी आपला विजय थेट पक्षाच्या जखमी कार्यकर्त्याला समर्पित केला.
निवडणुकीत विजयी झाल्यानंतर वनिता पाटील यांनी अधिकृत निवड प्रमाणपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून न स्वीकारता, सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पक्ष कार्यकर्ता तेजस पाटील यांच्या हातून स्वीकारले. या प्रतिकात्मक कृतीद्वारे त्यांनी आपल्या विजयाचे तसेच स्वतःच्या सुरक्षिततेचे श्रेय तेजस पाटील यांच्या धैर्याला आणि उपस्थितीला दिले.
तेजस पाटील जखमी होण्याची घटना १३ जानेवारी रोजी प्रचारादरम्यान घडली. प्रचार वाहनाजवळ उभे राहून ते पक्षाचा झेंडा धरुन होते. त्यावेळी तो झेंडा चुकून वरुन जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीला लागला आणि जोरदार विद्युत प्रवाह झेंड्यातून वाहू लागला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तेजस यांनी तात्काळ वाहनावरुन उडी मारली, त्यामुळे विद्युत प्रवाह वाहनात पसरला नाही. त्यांच्या या तत्परतेमुळे उमेदवारासह आजुबाजुचे अनेक पक्ष कार्यकर्ते मोठ्या दुर्घटनेतून वाचले.
या दुर्घटनेत तेजस पाटील गंभीर जखमी झाले. विद्युत धक्क्यामुळे त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत. त्यामुळे वनिता पाटील यांनी पाटील यांच्या सर्व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी स्वतः घेतली असून, सदरचेे आपले नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यानिमित्ताने वनिता पाटील यांनी सांगितले की, तेजसमुळेच आमचे प्राण वाचले. त्याने केवळ जीव वाचवला नाही, तर तळागाळातील राजकारणाची खरी ताकद काय असत, ते दाखवून दिले. अशा कार्यकर्त्यांमुळेच उमेदवार निवडून येतात. म्हणूनच माझे विजयपत्र त्याच्याच हातून स्वीकारणे मला योग्य वाटले.
वनिता पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पॅनल क्रमाक-२ मधून निवडणूक लढवली होती. या पॅनलमधून ‘शिवसेना'चे ३ तर ‘भाजपा'चा १ उमेदवार विजयी झाला. दरम्यान, वनिता पाटील यांच्या या भावनिक आणि संवेदनशील कृतीचे राजकीय आणि नागरी वर्तुळात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.