पावसाळ्यासाठी अधिक सतर्क राहण्याचे ना. गणेश नाईक यांचे प्रशासनाला निर्देश
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सिडको प्रदर्शनी केंद्रातील सभागृहात सकाळी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नवी मुंबई महापालिका, पोलीस विभाग, सिडको, महानगर गॅस, महावितरण आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ना. गणेश नाईक यांनी शहरातील सखल भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
सर्व नाल्यांची वेळेत व योग्य प्रकारे स्वच्छता करण्याचे तसेच रस्त्यांवरील कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. याबरोबरच गटारावरील चेंबर्स सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच रेल्वे प्रशासनाने ट्रॅकमधील कचरा त्वरित स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्यातील आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची सूचना केली. बैठकीत सर्व यंत्रणा आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने सज्ज असल्याचे दिसले, मात्र तरीही अधिक सतर्क राहण्याचे आदेश नामदार नाईक यांनी दिले आहेत. या आढावा बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह ज्येष्ठ लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.