गणेशोत्सवात ६ लाख कोकणवासियांचा ‘एसटी'ने सुखरुप प्रवास -ना. प्रताप सरनाईक

मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासियांनी ‘एसटी'ने सुखरुप प्रवासाचा आनंद घेतला. यातून ‘एसटी'ला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाड्या-वस्त्यांवर या लाखो कोकणवासियांना सुखरुप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक-अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्‌गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले.

यंदा गणपती उत्सवासाठी ‘एसटी'द्वारे कोकणवासियांसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसद्वारे १५,३८८ फेऱ्यातून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करुन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे, असेही नामदार सरनाईक यांनी सांगितले.

कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात ‘एसटी'ची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक आणि बसथांब्यावर ‘एसटी'मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेसना पर्याय म्हणून चिपळूण, महाड आणि माणगाव आगारात १०० बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मसाला मार्केट आवारात खड्ड्यांचे साम्राज्य?