अंबरनाथच्या छाया रुग्णालयात रुग्णांचे हाल 

अंबरनाथः ‘रोगापेक्षा इलाज भयंकर' या म्हणीची प्रचिती सध्या अंबरनाथच्या बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना येत आहे. रुग्णालयातील सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांना अक्षरशः उन्हाने तापलेल्या पत्र्याच्या शेडखाली तासनतास बसून उपचारांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

रुग्णालयातील या विदारक स्थितीचा अनुभव खुद्द शिवसेनेच्या नगरसेविका रूपाली गेजगे यांनाही ३० मार्च रोजी आला. त्यांच्या मुलाला भटक्या श्वानाने चावा घेतल्याने त्या उपचारांसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना रुग्णांची होणारी प्रचंड हेळसांड पाहायला मिळाली.  रुग्णांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन ओपीडीमध्ये अद्याप विद्युत व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, हा विभाग वापराविना पडून असून रुग्णालयाच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्येच सध्या ओपीडी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकाच डॉक्टरकडून सर्व रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. एकीकडे रुग्ण उन्हाच्या झळा सोसत असताना, दुसरीकडे रुग्णालयातील अधिकारी मात्र वातानुकूलित केबिनमध्ये बसून काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णालयातील भोंगळ कारभाराची माहिती मिळताच नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोहर बनसोडे अनुपस्थित होते; त्यांच्याकडे उल्हासनगर आणि अंबरनाथ अशा दोन रुग्णालयांचा कार्यभार असल्याने ते उपलब्ध नव्हते. दरम्यान, रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते, मात्र सोमेश्वर यांनी स्वतः विचारणा केली असता त्यांना इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. यावरून रुग्णालयात औषधांचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचा संशय विकास सोमेश्वर यांनी व्यक्त केलं आहे.

छाया रुग्णालयाची इमारत मोडकळीस आलेली आहे या संदर्भात शासनाकडे आम्ही लेखी माहिती दिलेली आहे जागा उपलब्ध नसल्याने ओपीडी पत्राच्या शेडमध्ये सुरू आहे, रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे रुग्णांना देण्यात येतात कोणत्याही प्रकारचा काळाबाजार येथे होत नाही.

मनोहर बनसोडे,वैद्यकीय अधिकारी, छाया रुग्णालय

उनव्याने तयार केलेला बाह्यरुग्ण विभाग केवळ वीज नसल्याने बंद आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे माझ्या मुलासह इतर सर्व रुग्णांना या रणरणत्या उन्हात पत्र्याच्या शेडखाली ताटकळत बसावे लागत आहे.
 -रूपाली गेजगे, रुग्ण नातेवाईक 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जेसीबीच्या निष्काळजीपणामुळे २२ केव्ही लाईन ठप्प