नगरपालिकेच्या कारभाराविरोधात भाजप आक्रमक

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांमधील अनियमितता आणि भ्रष्टाचारावरुन ‘भाजपा'ने नगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम आणि पथदिव्यांच्या अभावामुळे होणाऱ्या वाढत्या अपघातांवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ‘भाजपा'ने २५ सप्टेंबर रोजी नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोका आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘भाजपा'चे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील आणि इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी नवीन रस्त्यांच्या कामात पथदिवे बसवणे अपेक्षित असतानाही ते बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, अपघात आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर प्रश्नावर वारंवार मागणी करुनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असे नमूद केले आहे.

याशिवाय निवेदनामध्ये भाजप नेत्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे दाखले देण्यात आले आहेत, तिथेही पथदिवे, गटारे आणि नाले यांसारखी कामे अपूर्ण आहेत. विशेष म्हणजे ज्या रस्त्यांसाठी पथदिव्यांचा खर्च आधीच झाला आहे, त्याच कामांसाठी पुन्हा नव्या निविदा काढण्यात आल्या आहेत. याशिवाय, एकाच रस्त्याचे काम बांधकाम विभाग आणि प्रकल्प विभाग या दोन्ही विभागांकडून कसे झाले, असा सवालही ‘भाजपा'ने उपस्थित केला. सदर प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेला मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अपघातातील मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी आणि शहरात तातडीने पथदिवे बसवून अंध नगरी म्हणून होणारी बदनामी थांबवावी, अशा प्रमुख मागण्या ‘भाजपा'ने केल्या आहेत. दरम्यान, सदर मागण्या मान्य न झाल्यास २५ सप्टेंबर रोजी नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्धार ‘भाजपा'ने व्यक्त केला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल पॉड टॅक्सी