ऑडी कारनंतर आता दुचाकी खाडीत कोसळली
नवी मुंबई : जुलै महिन्यात महिलेची ऑडी कार थेट बेलापूर येथील ध्रुवतारा जेट्टीजवळच्या खाडीत कोसळल्याची घटना ताजी असतानाच २७ सप्टेंबर रोजी सकाळी देखील दुचाकीवरुन पनवेलच्या दिशेने जाणारे दोघा मित्र रस्ता चुकल्याने ते थेट याचठिकाणी खाडीमध्ये दुचाकीसह कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने जवळच असलेल्या सागरी सुरक्षा रक्षकांनी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाला सुखरुप वाचवले आहे. मात्र, दुचाकी चालक असलेला त्याचा मित्र खाडीत वाहून गेला आहे. त्यामुळे त्याचा पोलिसांसह सागरी सुरक्षा दालाचे जवान शोध घेत आहेत.
या दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाचे नाव श्रेयस अशोक झोंग (२३) असे असून तो ऐरोली येथे राहण्यास आहे. तर खाडीत वाहून गेलेल्या तरुणाचे नाव अथर्व शेलके (२३) असे असून तो पनवेल येथे बहिणीकडे राहण्यास आहे. दोघे मित्र आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. २६ सप्टेंबर रोजी रात्री अर्थव शेलके डोंबिवलीहून त्याच्या दुचाकीवरुन ऐरोली येथे श्रेयस झोंग याच्या घरी गेला होता. त्यानंतर दोघ्ोही बेलापूर येथील मित्राला भेटण्यासाठी गेले होते.
रात्री ते बेलापूर येथे मित्राकडे थांबल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन उलवेमार्गे पनवेल येथे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी अर्थव शेलके दुचाकी चालवत होता, तर श्रीयस झोंग पाठीमागे बसला होता. यावेळी अथर्व शेलके याला अंधारात रस्ता न समजल्याने त्याने उड्डाणपुलावरुन जाण्याऐवजी सरळ बेलापूर जेट्टीकडे जाणारा मार्ग पकडला. त्याठिकाणी रस्ता बंद असल्याचा फलक लावलेला असतानाही, त्याने तो लक्षात घेता आपली दुचाकी वेगात नेली. त्यामुळे ते दोघेही दुचाकीसह थेट खाडीत कोसळले.
सुदैवाने, जेट्टीजवळच सागरी किनारा सुरक्षा पोलीस चौकी असल्याने त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती अटल सेतू बचाव पथकाला कळवले. यावेळी बचाव पथकाने श्रेयस झोंग याला वाचवले तसेच दुचाकीही बाहेर काढली. मात्र, अथर्व शेलके त्यांना सापडला नाही. दिवसभर खाडीमध्ये त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, अर्थव शेलके सापडला नाही. त्यामुळे अर्थव बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
दरम्यान, याच ठिकाणी जुलै महिन्यात महिला कारने उलवे येथे जात असताना, उड्डाणपुलाऐवजी चुकीचा रस्ता घेतल्याने ती ऑडी कारसह याचठिकाणी खाडीत कोसळली होती. त्या वेळी सागरी सुरक्षा रक्षकांनी या महिलेला सुरखरुप बाहेर काढुन तिला वाचवले होते. तसेच तिची कार देखील बाहेर काढली होती.