नाट्यगृहाच्या उद्घाटनापूर्वी पुनर्वसनाची मागणी
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील प्रस्तावित नाट्यगृहाशेजारी राहणाऱ्या ५३० झोपडपट्टीवासियांनी प्रशासनासमोर पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. नाट्यगृहाच्या उद्घाटनापूर्वी आपले पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागपंथी डवरी, गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांनी पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट केली.
२०२० पासून तात्पुरत्या निवारामध्ये अंबरनाथ (पश्चिम) येथील नगरपालिका कार्यालयाच्या मागे असलेल्या सर्कस मैदानात नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. २०२० साली नाट्यगृहाच्या कामासाठी प्रशासनाने येथील झोपड्या हटवल्या होत्या. त्यावेळी प्रशासनाने रहिवाशांना पुनर्वसनाचे लेखी आणि तोंडी आश्वासन दिले होते. त्यानंतर या रहिवाशांनी तात्पुरती पत्र्याची घरे बांधून येथेच वास्तव्य केले आहे.
मूलभूत सुविधांचा अभाव...
या झोपडपट्टीत भटक्या विमुक्त समाजाचे लोक अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गटारे तुंबलेली आहेत आणि यामुळे डासांचा उपद्रव वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी रहिवाशांनी यापूर्वी मोर्चा देखील काढला होता. परंतु, त्यांना केवळ आश्वासनेच मिळाली.
वारंवार आश्वासने, कार्यवाही शून्य...
गेल्या २५ वर्षांपासून हक्काच्या घरासाठी संघर्ष करत असलेल्या या रहिवाशांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यांनी पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आहे. प्रशासनाने आतापर्यंत पुनर्वसनासाठी ९ जागा दाखवल्या असल्या, तरी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी खंत भीमराव इंगोले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या उद्घाटनापूर्वी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी इंगोले यांनी लावून धरली आहे.