नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील रस्त्यावरील पहिल्या अपघातात तीन वाहनाचा भीषण अपघात
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील रस्त्यावरील पहिल्या अपघातात तीन वाहनाचा भीषण अपघात
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी पनवेल व उलवे दरम्यान बनवण्यात मार्गावर तीन वाहने एकमेकावर धडकल्याची घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विमानतळाच्या उद्घाटनासाठी बनविण्यात आलेल्या या रस्त्यावर अद्याप रस्ता दुभाजक बनविण्यात न आल्याने वाहन चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी काही दिवसांपूर्वीच पनवेल ते उलवे या मार्गावरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास याच मार्गावरून जाणाऱ्या ऑडी आणि बलेनो या दोन कार वाघिवली गावाजवळील वळणावर समोरासमोर आल्या. या मार्गावर अद्याप रस्ता दुभाजक अथवा व्हाईट पट्टे मारण्यात आलेले नसल्याने दोन्ही कार चालकाना आपल्या समोरून येणाऱ्या कारचा अंदाज आला नाही. त्यामुळे हे दोन्ही कार एकमेकावर जोरदार धडकल्या. याचवेळी पाठीमागून येणारा छोटा हत्ती टेम्पो देखील या कारवर धडकला.
या अपघातानंतर टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोचा चालक किरकोळ जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने तिन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी, या अपघातातील तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सद्या या मार्गावर रस्ता दुभाजक अथवा पट्टे मारण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाघिवली गावाजवळच्या वळणावर नेहमी अपघात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.