अंबरनाथच्या पाणीटंचाईचे ‘लाईव्ह' दर्शन

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेकडील भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण पाणीटंचाईचा उद्रेक पहावयास मिळाला. वारंवार तक्रारी करुनही प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त महिलांनी ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'च्या (एमजेपी) कार्यालयावर धडक दिली. यावेळी केवळ शब्दात तक्रार न मांडता, महिलांनी थेट आपल्या भागातून व्हिडिओ कॉल लावून नळाला पाणी कसे येत नाही, याचे ‘लाईव्ह' वास्तव अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर मांडले. तसेच येत्या ८ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास एमजेपी कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना ‘सरप्राईज गिपट' देऊ, असा इशारा समाजसेविका जयश्री गुप्ता यांनी दिला आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील जावसई, फुलेनगर, कमलाकर नगर, डिफेन्स कॉलनी आणि ठाकूर पाडा या भागांमध्ये ४-४ दिवसांनी आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्यासाठी महिलांना नोकरी सोडावी लागली, तर मुलांच्या शिक्षणावरही याचा परिणाम होत असल्याच्या वेदना यावेळी मांडण्यात आल्या. अंबरनाथमध्ये दोन धरणे असूनही शहराला टँकरवर अवलंबून राहावे लागते, हीच मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाणी चोरी, अनधिकृत नळजोडण्या आणि टँकर माफियांच्या हस्तक्षेपामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

दरम्यान, ‘जीवन प्राधिकरण'चे अधिकारी मिलिंद देशपांडे यांनी तांत्रिक अडचणींची बाजू मांडताना सांगितले की, नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी अजून दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागेल. सध्याची तूट भरून काढण्यासाठी ‘एमआयडीसी'कडे वाढीव पाण्याची मागणी केली असून, ते उपलब्ध झाल्यास तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करु. मात्र, सदर आश्वासने जुनीच असल्याचे सांगत, जर ८ दिवसांत परिस्थितीत बदल झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माथाडी कामगारांवरील अन्यायाविरोधात मोर्चा