उरण रेल्वे स्थानकातील गुडशेडमध्ये ‘घाण'च घाण
उरण : उरण रेल्वे स्थानकातील (पश्चिम) गुडशेड मोकाट गुरे-ढोरे,बकऱ्या आणि मद्यपी, अंमली पदार्थ सेवन आणि प्रेमीयुगुलांसाठी अनैतिक धंद्याचा अड्डाच बनला आहे.मध्यरेल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच या ठिकाणी गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याने प्रवाशाी संताप व्यक्त करीत आहेत.
पन्नास वर्षांच्या प्रर्दिघ प्रतिक्षेनंतर सव्वा वर्षांपूर्वी बहुचर्चित उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. प्रवासी वाहतुकीच्या स्थानकाबाहेर तिकीट घर, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबरच वीज हायमास्टही बसविण्यात आले आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला असलेल्या मालवाहू स्थानकातुन पाचसहा महिन्यांपासून क्रुड ऑईल, सिमेंट आणि कच्च्या मालाच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. गेल्या एका एप्रिल महिन्यातच २३१ वॅगनमधुन झालेल्या मालवाहतूकीतुन मध्य रेल्वेने दोन कोटी ८१ लाखांची कमाई केली आहे, असे जनसंपर्क अधिकारी पी.डी. पाटील यांनी सांगितले.
दुसरीकडे मात्र वॅगनमधुन होणाऱ्या मालवाहतूकीतुन कोट्यवधींची कमाई करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने मालवाहू फलाटावर अद्याप कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात अक्षम्य दुर्लक्षच केल्याचे निदर्शनास येत आहे. मालवाहू स्थानकाच्या खुल्या गुडशेडच्या बाजुलाच कोट्यवधींचा खर्च करून मालाची चढउतार करण्याच्या कामांसाठी येणारे माथाडी आणि इतरांसाठी आराम कक्ष तसेच स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मात्र, कोट्यवधींचा खर्च करुन उभारण्यात आलेल्या आराम, कामकाज कक्ष आणि स्वच्छतागृहाची पार दुर्दशा झाली आहे. आराम, कामकाज कक्ष, स्वच्छतागृह आता नावापुरतेच उरले आहेत. यामध्ये दिवसाढवळ्याच मोकाट गुरे-ढोरे, बकऱ्या आणि मद्यपी, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या आणि प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. याकडे रेल्वे प्रशासनाकडूनच होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे गुडशेड परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गुडशेड परिसर सर्वत्रच अस्वच्छतेमुळे गुडशेड,आराम, कामकाज कक्ष, स्वच्छतागृह आणि आता एकप्रकारे अनैतिक धंद्यांचा अड्डाच बनला आहे. रात्री तर याठिकाणी हायमास्ट आणि वीजेची सोय नसल्याने अनैतिक धंद्यांना उतच येत आहे. गुडशेड, आराम, कामकाज कक्ष, स्वच्छतागृहातील पंखे, वायर्स चोरीस गेलेल्या आहेत. यावर कहर म्हणजे चोरट्यांनी कुलूप तोडून आपले कुलुप ठोकले असल्याचे येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परिस्थिती हाताबाहेर गेली तर उरण रेल्वे स्थानकातील गुंड शेडमध्ये अनैतिक धंद्यांना उतच येणार असल्याची भीतीही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या गंभीर परिस्थितीबाबत नेमकी माहिती घेऊन माहिती देतो, अशी प्रतिक्रिया जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.